११ हजारांची बॅग केली परत, ऑटोरिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
By admin | Published: December 31, 2014 12:50 AM2014-12-31T00:50:52+5:302014-12-31T00:50:52+5:30
वाहतूक पोलिसांनी दाखविली दक्षता.
अकोला : प्राध्यापकांना शिकवणी शुल्कापोटी देण्याकरिता आणलेल्या ११ हजार रुपयांची बॅग बारावीत शिकणारा तरुण शहरातील टॉवर चौकात ऑटोरिक्षातच विसरला. ऑटोरिक्षा मलकापूरमध्ये गेल्यावर चालकाला हे लक्षात आले. सदर ऑटोरिक्षाचालकाने परत टॉवर चौक गाठून ती बॅग युवकाला परत केली. ही घटना ३0 डिसेंबर रोजी दुपारी घडली.
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील वरुड या गावातील रहिवासी असलेला हृषीकेश दुनारे हा अकोला येथे बारावीचे शिक्षण घेतो. मंगळवारी दुपारी तो शिकवणीचे ११ हजार रुपये प्राध्यापकांना देण्यासाठी बॅगेत घेऊन शहरात आला होता. टॉवर चौकात उतरल्यानंतर तो बॅग ऑटोरिक्षातच विसरला. हृषीकेशला उतरून दिल्यानंतर चालक विजय इंगळे हा ऑटोरिक्षा घेऊन मलकापूरला गेला.
त्यानंतर हृषीकेशला बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्याने चौकातील वाहतूक पोलिसांकडे जाऊन बॅग विसरल्याचे तसेच त्यामध्ये ११ हजार रुपये असल्याचेही सांगितले. पैसे परत मिळतील की नाही, या चिंतेने हृषीकेशला रडू कोसळले होते. चौकातील वाहतूक पोलीस संजय इंगळे व शरद इंगळे यांनी त्याचे सांत्वन करीत, कोणत्या ऑटोत, कोणत्या ठिकाणाहून बसला, याची माहिती घेतली. मात्र, त्याच्याकडे ऑटोरिक्षाचा क्रमांक नव्हता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हृषीकेश ज्या ठिकाणी ऑटोरिक्षात बसला त्या ठिकाणी जाऊन तेथे असलेल्या इतर चालकांशी चर्चा केली आणि तो कोणत्या ऑटोरिक्षात बसला, याची माहिती घेतली. त्यांनी दोन ऑटोरिक्षा त्याच्यामागे पाठविल्या.
दरम्यान, मलकापूरला पोहोचल्यावर एमएच ३0 - ९६८६ क्रमांकाचा ऑटोरिक्षा असलेला विजय इंगळे यांना प्रवासी बॅग विसरल्याचे लक्षात आले. बॅगेत ११ हजार रुपये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मोहाला बळी न पडता, टॉवर चौकात ऑटोरिक्षा परत आणला आणि वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती दिली. सदर पोलिसांनी विजय इंगळे यांची हृषीकेशशी भेट घालून दिली. बॅग त्याचीच असल्याची खात्री दिल्यानंतर हृषीकेशला पैशांसकट बॅग परत मिळाली. ऑटोरिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतुक केले.