प्रकट मुलाखत : दोन घटनांनी ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण झाले - मतीन भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:12 AM2020-02-02T11:12:12+5:302020-02-02T11:12:26+5:30
७ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी मतीन भोसले यांची प्रकट मुलाखत झाली.
- नीलिमा शिंगणे-जगड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आयुष्यात असे काही प्रसंग येतात, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. माझ्याही आयुष्यात असे दोन प्रसंग आले की, ज्यामुळे मी पूर्णपणे बदलत गेलो. एक म्हणजे फासे पारधी समाजाची दोन मुले नाल्याच्या पुरात वाहून गेले आणि दुसरा म्हणजे मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर भीक मागत असताना दोन भीक मागणारी मुले रेल्वेखाली कटून मरण पावली. हे दृश्य एवढे विदारक होते की, मी त्याप्रसंगी आत्महत्येचा विचार केला; मात्र याच प्रसंगातून सावरू न प्रश्नचिन्ह ही भटक्या आणि आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण देणारी संस्थेची निर्मिती झाली, असे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी सांगितले.
७ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी मतीन भोसले यांची प्रकट मुलाखत झाली. मुलाखत कवी किशोर बळी यांनी घेतली. मतीन भोसले यांचा जीवन प्रवास एकेका प्रसंगातून उलगडत गेला. एवढ्या कष्टातून उभारलेल्या प्रश्नचिन्हावर मात्र आज प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. त्याचे उत्तर विद्यमान सरकारने द्यायला पाहिजे. समृद्धी महामार्गामुळे प्रश्नचिन्ह संस्था उद्ध्वस्त झाली आहे. प्रश्नचिन्हसाठीचा संघर्ष एका वळणावर असतानाच समृद्धीची कुºहाड प्रश्नचिन्हावर पडली. लोकवर्गणीतून १ कोटी ७७ हजार मदत मिळाली होती. यामधून वर्गखोल्या, वाचनालय, २५० झाडे लावून प्रश्नचिन्हची इमारत दिमाखात उभी राहिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष घातल्यास नव्याने प्रश्नचिन्हाचा प्रवास सुरू होऊ शकतो, असे भोसले म्हणाले.
पारधी समाजाच्या माथ्यावर चोर हा शिक्का बसलेला आहे. पारधी समाजातील मुले, आदिवासी मुले, रस्त्यावर भीक मागणारी मुले यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शाळा सुरू केली. शाळा चालविण्यासाठी पैसे लागतात. यासाठी भीक मांगो आंदोलन सुरू केले. या आंदोलनात लोकांकडून केवळ एक रुपया मागत होतो. या आंदोलनादरम्यान २१ दिवसांत २८ पोलीस केसेस दाखल झाल्या.
मुलांची तस्करी करतात, त्यांच्या किडन्या काढतात, राजस्थानमध्ये मुली विकतात, अशा प्रकारचे आरोप लावण्यात आले होते. याच दरम्यान कारागृहातही डांबण्यात आले. कारागृहातील हा विलक्षण अनुभव होता, असेदेखील भोसले यांनी सांगितले.