गाळेधारकांच्या अनामत रकमेतून उभारणार ७.५ कोटींचा महसूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:55 AM2018-09-15T10:55:33+5:302018-09-15T10:58:02+5:30
अकोला : रेल्वेस्थानक मार्गावरील शास्त्री स्टेडियममधील व्यापारी संकुलातील प्रत्येक गाळेधारकांना पाच लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
- संजय खांडेकर
अकोला : रेल्वेस्थानक मार्गावरील शास्त्री स्टेडियममधील व्यापारी संकुलातील प्रत्येक गाळेधारकांना पाच लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. यातून साडेसात कोटींचा महसूल गोळा करण्याचा प्रयत्न अकोला जिल्हा क्रीडा समिती करीत आहे. त्यासाठी शास्त्री स्टेडियमच्या १५६ गाळेधारकांना लवकरच नोटीस दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील क्रीडांगणांना चांगला दर्जा मिळवून देण्यासाठी आणि चांगले खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. शासनानेदेखील त्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिल्याने अकोला क्रीडा समितीने महसूल उभारणीसाठी पाऊल उचलले आहे. अकोला शहरातील वसंत देसाई आणि शास्त्री स्टेडियममध्ये अद्ययावत सुविधा पुरविण्यासाठी क्रीडा समिती पुढाकार घेत आहे. जुने बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाच्या प्रमुख मार्गावरील शास्त्री स्टेडियमचे १५६ गाळे ३० वर्षांपासून नाममात्र भाडेपट्ट्याने दिले आहे. आजच्या महागाईच्या तुलनेत सदर गाळे अत्यंत स्वस्त दरात दिलेले आहे. या गाळेधारकांकडून अनामत रक्कमही घेण्यात आलेली नाही. जिल्हा क्रीडा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हा सचिव-जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी शास्त्री स्टेडियमच्या गाळेधारकांचा करार तपासून पाहिला. यामध्ये अनामत रक्कम नाही आणि ३० वर्षे नाममात्र भाडेपट्ट्यावर व्याजदर लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक गाळेधारकांना पाच लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची सक्ती केली जाणार आहे, त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी १५६ गाळेधारकांना नोटीस बजावली आहे.
*तीन दिवसांत १९ लाख गोळा
शास्त्री स्टेडियमच्या गाळेधारकांकडे ३० लाख रुपये थकीत आहेत. त्यांना नोटीस बजावून आधीचे जिल्हा क्रीडा अधिकारी त्रासले होते; मात्र नव्यानेच रुजू झालेल्या क्रीडा अधिकाºयांनी तीन दिवसांत ३० पैकी १९ लाख रुपये गोळा केले आहे. करार भंग झाल्यास सील ठोकण्याचा इशारा दिल्याने ही वसुली झाली आहे.
* क्रीडांगणाभोवती लागणार तीन ‘एटीएम’
शास्त्री स्टेडियम आणि वसंत देसाई क्रीडांगणाचा महसूल वाढविणे आणि क्रीडांगणाचा चांगला सांभाळ करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेचे तीन ‘एटीएम’ उघडली जाणार आहेत. पंचेचाळीस-पन्नास हजार महिन्याचे भाडे त्यातून जिल्हा क्रीडा समितीला मिळणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी दिली आहे.