सत्ताधाऱ्यांकडून देशभक्तीची उलट-सुलट मांडणी - प्रो. चमनलाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 02:37 PM2019-10-02T14:37:49+5:302019-10-02T14:37:54+5:30
देशभक्तीची उलट-सुलट मांडणी करीत असल्याचा सनसनाटी घणाघात शहीद भगतसिंगांचे भाचे प्रो. चमनलाल यांनी मंगळवारी येथे केला.
अकोला : सध्याचे सत्ताधारी गद्दार आहेत. ते कधीही तुरुंगात गेले नाहीत; मात्र हेच सत्ताधारी आता खºया देशभक्तीची उलट-सुलट मांडणी करीत असल्याचा सनसनाटी घणाघात शहीद भगतसिंगांचे भाचे प्रो. चमनलाल यांनी मंगळवारी येथे केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचा समारोप तसेच शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त राज्यात १६ ठिकाणी प्रो. चमनलाल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेतीलच एक व्याख्यान मंगळवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रो. चमनलाल बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील धुळे व सरचिटणीस हरिदास तम्मेवार उपस्थित होते.
विज्ञान शिकणारे विद्यार्थी ज्याप्रमाणे प्रयोगशाळेत वारंवार प्रयोग करून शिकतात, त्याचप्रमाणे महात्मा गांधी, शहीद भगतसिंग यांनी देशाच्या रक्षणासाठी, देशाचे हित जोपासण्यासाठी सतत कार्य करीत असताना त्यांच्याही काही चुका झालेल्या असतील. याच चुका सुधारत ते मोठे व्यक्ती झाल्याचेही यावेळी प्रो. चमनलाल यांनी स्पष्ट केले. शहीद भगतसिंग यांच्या डोक्यावर पिवळा फेटा तसेच विविध रंगांचे फेटे असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत; मात्र भगतसिंग यांनी केवळ खादीचा फेटा घातलेला असून, काही धर्मांधांनी त्यांचे विविध रंगांचे फे टे घातलेले फोटो व्हायरल केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भगतसिंग हे जास्त काळ केवळ टोपीच वापरत होते. त्यामुळे टोपीवरील आणि खादीचा फेटा असलेला त्यांचा फोटो हा खरा असल्याचेही यावेळी प्रो. चमनलाल यांनी सांगितले. यावेळी महादेवराव भुईभार, अविनाश पाटील व हरिदास तम्मेवार यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय तिडके, विलासराव वखरे, विजय कौसल, जिल्हा अध्यक्ष अर्जुनराव गुडधे, बी. एस. इंगळे, पी. टी. इंगळे, पंजाबराव वर, डॉ. नितीन देऊळकर, आनंदराव गोटखेडे, विजय वाखारकर, रोहन बुंदेले, श्रीकृष्ण माळी, संघर्ष सावरकर, प्रा. दत्तात्रय भाकरे, गोपाल निवाने, गजानन ढाले, ओ. रा. चक्रे, विद्या राणे, सविता शेळके, प्रांजली जयस्वाल, जयसेन गुडधे व राहुल मालोदे यांनी परिश्रम घेतले.