पाेलिस दलात उलटफेर; पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या
By आशीष गावंडे | Published: September 4, 2024 08:44 PM2024-09-04T20:44:32+5:302024-09-04T20:45:10+5:30
पाेलिसांच्या कामकाजावर पाेलिस अधीक्षकांची करडी नजर
आशिष गावंडे, अकाेला: मागील अनेक दिवसांपासून जिल्हा पाेलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे भिजत घाेंगडे कायम हाेते. अखेर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ३ सप्टेंबर राेजी विविध पाेलिस ठाण्यांमधील पाेलिस निरीक्षक, सहायक पाेलिस निरीक्षकांच्या बदल्यांवर शिक्कामाेर्तब केले. अर्थातच,सणासुदीचे दिवस व विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर पाेलिसांच्या कामकाजावर पाेलिस अधीक्षक सिंह यांची करडी नजर असल्याचे बाेलल्या जात आहे.
लाेकसभा निवडणुकीच्या दरम्यान काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या हाेत्या. तेव्हापासून ते आजतागायत बदल्यांचे सत्र सुरु आहे. मध्यंतरी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही पाेलिस निरीक्षक, सहायक पाेलिस निरीक्षक व पाेलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या हाेत्या. परंतु राज्य निवडणूक आयाेगाने गृहविभागाला २० ऑगस्ट पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यामुळे जिल्हास्तरावरील बदल्यांना जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी तात्पुरता ‘ब्रेक’लावला हाेता. अखेर सप्टेंबर महिन्यात बदलीच्या मुद्यावर शिक्कामाेर्तब करण्यात आले. यामध्ये बाेरगाव मंजू येथील पाेलिस निरीक्षक मनाेज केदारे यांची खदान पाेलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. बाेरगाव येथे पाेलिस निरीक्षक पदी अनिल गाेपाळ, डाबकी राेड पाेलिस स्टेशनमध्ये धर्मा साेनुने , बार्शीटाकळी पाेलिस ठाण्यात प्रकाश तुनकलवार, पाेलिस निरीक्षक तपन काेल्हे यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा विभागात,अकाेटफैल पाेलिस ठाण्यातून सहायक पाेलिस निरीक्षक गजानन राठाेड यांची बदली हिवरखेड पाेलिस ठाणे,खदान पाेलिस ठाण्यातील सहाय्यक पाेलिस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांची मुर्तिजापूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात, पाेलिस नियंत्रण कक्षातील सहायक पाेलिस निरीक्षक अमाेल बारापात्रे यांची अकाेटफैल पाेलिस स्टेशनमध्ये दुय्यम अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
ह्यांची परजिल्ह्यात बदली
खदान पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक किशाेर शेळके वाशिम, हिवरखेडचे सहायक पाेलिस निरीक्षक गाेविंद पांडव यवतमाळ, मुर्तिजापूर ग्रामीणचे ठाणेदार कैलाश भगत यवतमाळ, मुर्तिजापूर पाेलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे बुलढाणा, बार्शीटाकळीचे ठाणेदार शिरीष खंडारे यांची बुलढाणा जिल्ह्यात बदली करण्यात आली.
केदारे यांच्यासमाेर आव्हानांचा डाेंगर
खदान पाेलिस स्टेशनमध्ये बुधवारी मनाेज केदारे यांनी पदभार स्वीकारला. या पाेलिस ठाण्यातील गुन्हे शाेध पथकातील काही कर्मचाऱ्यांमुळे पाेलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळेच मध्यंतरी जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी ‘डीबी स्काॅड’ बरखास्त केले हाेते. अंमलदारांचा पायपाेस नाही. स्टेशन डायरीवर कर्तव्य बजावणारे कर्मचारी जाणीवपूर्वक भ्रमणध्वनी बंद करुन ठेवून कर्तव्यापासून पळ काढतात. अनेक प्रकरणांचा काही पाेलिस कर्मचारी पाेलिस ठाण्याच्या बाहेरच निपटारा करतात. यासर्व बाबी व खदान पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता पाेलिस निरीक्षक केदारे यांच्यासमाेर आव्हान असल्याचे दिसून येते.