मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:19+5:302021-06-10T04:14:19+5:30
अकाेला : मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा महाराष्ट्र शासनाचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी वसंतरावजी नाईक ...
अकाेला : मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा महाराष्ट्र शासनाचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी वसंतरावजी नाईक अधिकारी, कर्मचारी संघटना (ट्रेड युनियन) जिल्हा शाखा अकोलाने जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे.
मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण संपुष्टात आणण्याच्या हेतूने शासनाने ७ मे २०२१ रोजी जो शासनादेश काढला आहे, तो असंख्य मागासवर्गीय कर्मचारी आणि नाेकरवर्गावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा शासन निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि मागासवर्गीय कर्मचारी आणि नाेकरवर्गांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास वसंतरावजी नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. विजय चव्हाण, उपाध्यक्ष शंकर चव्हाण, कोषाध्यक्ष रमेश पवार, कार्यध्यक्ष प्रा. डॉ. दारासिंग राठोड, सहसचिव रणजित राठोड, विनोद जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.