शिक्षण समितीच्या सभेत ‘ऑनलाइन-ऑफलाइन ’ शिक्षणाचा आढावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 10:58 AM2020-10-10T10:58:35+5:302020-10-10T10:58:41+5:30
Akola ZP शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचे नियोजनही सभेत करण्यात आले.
अकोला: जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या ‘आॅनलाइन- आॅफलाइन’ शिक्षणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचे नियोजनही सभेत करण्यात आले.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. या कामांचा आढावा घेत, स्मार्टफोन उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन शिक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सभेत घेण्यात आली. आॅनलाइन व आॅफलाइन शिक्षणात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासंदर्भात दक्षता घेण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजन या सभेत करण्यात आले. अकोट पंचायत समिती अंतर्गत ठोकबर्डी येथे नवीन शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेण्याचे सभेत ठरविण्यात आले. बाळापूर पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांचे अर्थविषयक प्रश्न सोडविण्यासाठी लेखाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठित करण्याचे सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत समितीचे सदस्य रामकुमार गव्हाणकर, पवन बुटे, गणेश बोबडे, वर्षा वजिरे, रंजना विल्हेकर, आम्रपाली खंडारे, प्रगती दांदळे, रिझवाना परवीन शेख मुख्तार, प्रमोद फाळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैषाली ठग यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.