शिक्षकांच्या वेतन देयकांची फेरतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:56 PM2019-08-02T13:56:34+5:302019-08-02T13:56:41+5:30
सातही पंचायत समित्यांमध्ये वेतन देयकांची पडताळणी करण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील शिक्षकांना वेतन मिळण्यास कमालीचा विलंब होत असल्याने याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पंचायत समिती स्तरावरून आढावा घेत वेतन तातडीने अदा करण्यासाठी सूचना दिल्या. त्याचवेळी बाळापूर पंचायत समितीमध्ये शिक्षकांच्या वेतन देयकाच्या पडताळणी अतिरिक्त रक्कम अदा होत असल्याचे उघड झाले. त्यामुळे सातही पंचायत समित्यांमध्ये वेतन देयकांची पडताळणी करण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावले.
जिल्ह्यातील शिक्षक, ग्रामसेवकांच्या वेतनाला कमालीचा विलंब होत असून, संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईचा फटका या दोन्ही संवर्गाला बसत आहे. त्यामुळे या संवर्गात प्रचंड नाराजी पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रसिद्ध केले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पंचायत समिती स्तरावरून माहिती घेतली. यावेळी बाळापूर पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी साखरकर यांनी वेतन देयकाची सेवापुस्तकातील नोंदीनुसार तपासणी केली जात आहे. त्यामध्ये ५० शिक्षकांच्या वेतन देयकात ८० हजार रुपयांपर्यंतची रक्कम अतिरिक्त अदा होण्याची शक्यता असल्याचे पुढे आले.
संभाव्य आर्थिक अपहार रोखण्यासाठी सर्व सेवापुस्तकानुसार वेतन देयक तपासण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी साखरकर यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. तसेच इतरही पंचायत समितीमध्ये हा प्रकार घडण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी शिक्षकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करूनच देयकाला मंजुरी देण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.
दोन महिन्यांपासून वेतन नाही!
शिक्षकांचा जून महिन्याचा पगार आजपर्यंतही झालेला नाही. शिक्षण विभाग, अर्थ विभागातील अधिकारी-कर्मचाºयांच्या बेपर्वाईचा फटका जिल्ह्यातील शिक्षकांना सहन करावा लागत आहे. वेतन देयकात अधिकाºयाच्या स्वाक्षरी नसणे, देयक कोषागारात जमा केल्यानंतर सर्व्हर डाउन आहे. सीएमपी आली नाही, या कारणांमुळे वेतनाला विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शिक्षकांना भुर्दंड
मुलांच्या शाळांची फी, कुटुंबातील लग्नकार्य, खर्च प्रचंड असताना शिक्षकांना वेतनच मिळालेले नाही. त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक, शैक्षणिक, वाहन कर्जाचे हप्ते कसे भरायचे, या काळजीनेही शिक्षकांची झोप उडाली आहे. वेतनाच्या अनियमिततेमुळे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य नाही. जादा व्याजाचा भुर्दंडही शिक्षकांना भरावा लागत आहे.
आमदारांनीही घेतली बैठक
वेतनाला विलंब होत असल्याच्या कारणावरून बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनीही शिक्षकांची ही समस्या निकाली काढण्याच्या मुद्यांवर गुरुवारी बैठक घेत निर्देश दिले.