जिल्हा बँकेत नोटा स्वीकारण्याची बंदी मागे घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 02:04 AM2016-11-18T02:04:21+5:302016-11-18T02:04:21+5:30

शेतक-यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे!

Revoke the ban on accepting a no-objection letter in the district bank! | जिल्हा बँकेत नोटा स्वीकारण्याची बंदी मागे घ्या!

जिल्हा बँकेत नोटा स्वीकारण्याची बंदी मागे घ्या!

Next

अकोला, दि. १७- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची बंदी मागे घेऊन, ग्रामीण भागातील शेतकरी-शेतमजुरांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
देशातील कृषी अर्थव्यवस्था मुख्यत: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात जिल्हा सहकारी बँकेच्या शाखांचे जाळे पसरले असून, जिल्हा सहकारी बँकांच्या शाखांमध्ये प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे खाते मोठय़ा प्रमाणावर आहेत; परंतु ५00 व १000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ५00 व १000 रुपयांच्या जुन्या चलनी नोटा स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ५00 व १000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करणार्‍या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या सोयाबीन व कापूस पिकाचा हंगाम सुरू असून, उत्पादित मालाची विक्री केल्यानंतर नोटा बँकेत जमा करण्यासाठी १५ ते २0 किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीयीकृत बँकेत जाणे व नोटा बदलून घेणे, शेतकर्‍यांसाठी कठीण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या जिल्हा, तालुका स्तरावर तसेच मोठय़ा लोकसंख्येच्या गावात शाखा असल्याने, शेतकर्‍यांना शेतीची कामे सोडून नोटा बदलून घेण्याकरिता दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.
दिवसभर रांगेत उभे राहूनही पैसे मिळतीलच, याबाबतची खात्री नाही. रब्बी पीक पेरणीचा हंगाम सुरू असून, नोटा बदलण्यासाठी शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पेरणीचा खोळंबा निर्माण होत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा बँकांतील नोटाबंदीमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५00 व १000 रुपयांच्या स्वीकारण्याची बंदी मागे घेऊन, शेतकरी व शेतमजुरांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यासंबंधीच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधानांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. सुभाषचंद्र कोरपे, नीळकंठ खेडकर, देवराव पाटील हागे, प्रल्हाद ढोरे, ज्ञानेश्‍वर महल्ले, प्रकाश काळे, सचिन वाकोडे, रामेश्‍वर वाघमारे, बळीराम कपले यांच्यासह बाजार समितीचे संचालक, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष व शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Revoke the ban on accepting a no-objection letter in the district bank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.