बंडखोरी भोवली; अशोक ओळंबे भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:29 PM2019-10-05T12:29:18+5:302019-10-05T12:29:45+5:30
भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी सायंकाळी डॉ. ओळंबे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचे पत्र जारी केले.
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार आ. गोवर्धन शर्मा यांच्या विरोधात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांनी शुक्रवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज सादर केला. याप्रकरणी भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी सायंकाळी डॉ. ओळंबे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचे पत्र जारी केले.
निमित्त ओळंबेंचे, लक्ष्य पालकमंत्री!
अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, असे दोन गट असल्याचे सर्वश्रृत आहे. या दोन्ही गटांमध्ये सतत कुरघोडीचे राजकारण सुरु असते. डॉ. ओळंबे यांच्या निलंबनाच्या निमित्ताने याच कुरघोडीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. डॉ. ओळंबे हे पालकमंत्र्यांचे समर्थक आहेत. त्यांनी अकोला पश्चिममध्ये अर्ज दाखल करुन खासदार गटाला संधी दिली. त्या संधीचा फायदा उठवित ओळंबे यांचे पक्षातून तात्काळ निलंबन करण्यात आले. या संपुर्ण प्रकारात ओळंबेंच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनाच पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे.
बंडखोर गव्हाणकर, नाचणे यांना अभय का?
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या ओळंबे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करणाºया भाजपने बाळापूरात बंडखोरी करणारे माजी आ. नारायण गव्हाणकर, मूर्तिजापूरमधील बंडखोर पक्षाचे तालुका सरचिटणीस राजकुमार नाचणे यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा उचललेला नाही. त्यामुळे या दोन बंडखोरांना अभय का ?, असा प्रश्न निष्ठांवत भाजप कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे.
मला निलंबित करण्याचा कवडीचाही अधिकार महानगराध्यक्षांना नसून, तो प्रदेशाध्यक्षांना आहे. अकोल्यात भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा आवाज नेहमीच दाबण्याचा प्रयत्न होतो. निलंबनाचे पत्रदेखील दबावतंत्राचा भाग आहे. त्यांच्या पदाचा व अधिकारांचा हा गैरवापर आहे.- डॉ. अशोक ओळंबे