नवरात्र संपताच भारनियमन सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 08:18 PM2017-10-04T20:18:09+5:302017-10-04T20:18:40+5:30
अकोला : कोळशाच्या तुटवड्यामुळे काही केंद्रांमधील विद्युत निर्मिती ठप्प झाल्याने राज्यभरात आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. नवरात्रोत्सव व दसरा उत्सव संपताच जिल्हय़ात भारनियमनाने पुन्हा उचल खाल्ली असून, शहर व ग्रामीण भागांमध्ये ८ ते ९ तास वीज पुरवठा खंडित राहत असल्यामुळे या ‘इर्मजन्सी लोडशेडिंग’ने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

विजेची वाढती मागणी व उपलब्धतेचा मेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी, महावितरणकडून राज्यभरात आपत्कालीन भारनियमन सुरू करण्यात आले आहे. वीज देयकांची वसुली व वीज गळतीच्या प्रमाणाचा अभ्यास करून जिल्हय़ाची ग्रुपनिहाय विभागणी केली आहे. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यास ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’, ‘जी १’, ‘जी २’ व ‘जी ३’ या ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केले जाते. गत काही दिवसांपासून विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणच्यावतीने जिल्हय़ातील सर्वच ग्रुपवर आकस्मिक भारनियमन केल्या जात आहे. मध्यंतरी वीज उपलब्धतेची स्थिती सुधारल्यामुळे तसेच नवरात्रोत्सव असल्यामुळे भारनियमनातून मुक्ती मिळाली होती; परंतु नवरात्रोत्सव संपताच भारनियमन पुन्हा सुरू झाले आहे. काही ग्रुपमध्ये सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्प्यात, तर काही ग्रुपमध्ये सकाळ, दुपार व रात्री अशा तीन टप्प्यांमध्ये सव्वातीन ते सव्वानऊ तासांपर्यंत भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
उकाडा करतोय त्रस्त
गत काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. ‘ऑक्टोबर हिट’ सुरू झाल्यामुळे घामधारांनी नागरिक आधीच त्रस्त असताना विजेच्या भारनियमनाने त्यात भरच पडली आहे. पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठय़ाअभावी पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत वाढच झाली आहे.