खदान परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:28 PM2019-06-10T13:28:06+5:302019-06-10T13:28:13+5:30
अकोला : खदान परिसरातील कवाडे नगरामध्ये शनिवारी उशिरा रात्री लहान मुलांमध्ये झालेल्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली.
अकोला : खदान परिसरातील कवाडे नगरामध्ये शनिवारी उशिरा रात्री लहान मुलांमध्ये झालेल्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीतील दोन्ही गटांतील ३५ जणांविरुद्ध खदान पोलीस स्टेशमनध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने व पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला. यावेळी सुमारे ३४ ते ३५ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कवाडे नगर येथे लहान मुलाला डोक्याला लागल्याच्या कारणावरून दोन गट अमोरासमोर आले होते. शाब्दिक वादानंतर झालेल्या दोन्ही गटांतील तुंबळ हाणामारीत काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका गटातील जावेद खान युनूस खान रा. नुराणी मशीद खदान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल ढोकणे, रूपेश वानखडे, गौतम मोरे, राजू खंडारे, मिलिंद जाधव, अमोल चोडे, शुभम अडागडे, विजय अडागडे, आकाश वानखडे, कुणाल वानखडे, भारत सुरोसे, विक्की अडागडे, रोहित वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसऱ्या गटातील विजय अडागडे यांच्या तक्रारीवरून आरोपी साहिल खान एजाज खान, मोहम्मद लाला मोहम्मद जबार, फईम खान आरीफ खान, मोहसीन खान याकुब, मोहम्मद कैफ मोहम्मद इलियास, अतमस खान, जावेदखान युनूसखान, मोहम्मद गणी मोहम्मद अकबर, शेख फैजल शेख, शेख मोहम्मद अन्सार शेख अब्दुल्ला, शाहरूख खान आरीफ खान, शेख रिहान शेख खलील, शेख इम्रान शेख खलील यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३५३, १४७, १४३, १४८, ३२४, ५०६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीमुळे खदान परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींची धरपकड सुरू असून, काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी करीत आहेत.