अकोल्याच्या माजी उपमहापौरांसह १६ जणांविरूद्ध दंगलीचे गुन्हे दाखल
By admin | Published: April 26, 2016 02:09 AM2016-04-26T02:09:36+5:302016-04-26T02:09:36+5:30
खदान परिसरात क्षुल्लक कारणावरून झाली होती हाणामारी.
अकोला : खदान परिसरातील एका मशिदीजवळ क्षुल्लक कारणावरून रविवारी रात्री झालेल्या हाणामारीप्रकरणी दोन्ही गटातील १६ आरोपींविरुध्द दंगलीसह प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये माजी उपमहापौर रफीक सिद्दीकी यांचाही समावेश आहे. खदान परिसरातील एका मशिदीजवळ रविवारी रात्री अल्पसंख्याक समाजाचा विवाह सोहळा असल्याने मंडप उभारण्यात आला होता. या मंडपासमोरच खत्री आणि सिद्दिकी यांचे कुटुंबिय राहतात. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. दोन्ही गटातील युवकांनी पाईप, तलवारी आणि काठय़ांनी मारहाण केली. या मारहाणीत ७ ते ८ जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी माजी उपमहापौर रफीक सीद्दीकी यांच्यासह ९ जणांविरुध्द भादंविचे कलम ३0७, १४७, १४८, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. दुसर्या गटाच्या तक्रारीवरून मो. शाहरुख मो. फारुख याच्यासह ७ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात ाले. लग्नसमारंभाचा आणि हाणामारीचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.