सैलानीत जैविक प्रदूषणाचा धोका
By Admin | Published: March 15, 2015 12:07 AM2015-03-15T00:07:09+5:302015-03-15T00:07:09+5:30
स्वाइन फ्लूचे संकट कायमच; नागरिकांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात.
विठ्ठल सोनुने /पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा ) : सर्व धर्माचे श्रद्धास्थान असलेले बुलडाणा तालुक्यातील सैलानी बाबांची यात्रा दोन दिवसांपूर्वी पार पडली.
या यात्रेनिमित्त सैलानी येथे देशभरातून लाखोच्या संख्येने दाखल झालेले भाविक परतीच्या मार्गाला लागले असून, पाच दिवसात लाखो क्विंटल कचर्याचे ढिगार यात्रा परिसरात जमले आहेत. यात्रा दरम्यान या परिसरात लावल्या जाणार्या हॉटेल, खानावळी, भाविकांच्या राहुट्याच्या आजूबाजूला शिल्लक राहलेली घाण परिसरात तशीच पडून आहे. शिवाय दोन दिवसांच्या पावसामुळे ही घाण परिसरात जैविक प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.
सैलानीबाबाच्या यात्रेला १ मार्चपासून सुरुवात झाली होती व ११ मार्च रोजी सैलानीबाबाच्या संदलचे दर्शन घेऊन भाविकभक्त सैलानी येथून रवाना झाले; मात्र यात्रा संपल्यानंतर यात्रा परिसरात जनावरांचे खराब मांस, भाविकांचे खराब झालेले कपडे, शिळे अन्न तसेच पडून आहे. शिवाय यात्रेदरम्यान भाविकांनी नाले, जंगल व शेत परिसराचा शौचासाठी वापर केला.
या दरम्यान १२ व १३ मार्च रोजी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन दिवसाच्या पावसानंतर सर्व साहित्य कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे विविध साथीचे आजार गावात पसरण्याची भीती वाढली आहे.
सैलानीबाबाचा संदल चढल्यानंतर यात्रा शेवटच्या टप्प्यात असून, भाविक भक्त परतीच्या मार्गावर आहेत; मात्र यात्रेदरम्यान कापण्यात आलेल्या जनावरांचे निरुपयोगी मांस व हाडाचे हे ढिगारे सडल्याने परिसरात घाणेरडा वास पसरत आहे. या जनावरांच्या अवशेषामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता सर्वत्र कचर्याचे ढिगार पडले आहेत.