नदी-नाले कोरडे; कृत्रिम पाणीटंचाईची झळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:24+5:302021-05-27T04:20:24+5:30

विजय शिंदे अकोट : तालुक्यात शेती व पिण्यासाठी सद्यस्थितीत मुबलक पाणी पुरवठा असला, तरी नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे ...

Rivers and streams dry; Artificial water scarcity! | नदी-नाले कोरडे; कृत्रिम पाणीटंचाईची झळ!

नदी-नाले कोरडे; कृत्रिम पाणीटंचाईची झळ!

Next

विजय शिंदे

अकोट : तालुक्यात शेती व पिण्यासाठी सद्यस्थितीत मुबलक पाणी पुरवठा असला, तरी नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्यासाठी वान धरणातून शहरवासीयांची तहान भागविली जात आहे. मात्र, नदी-नाले कोरडे पडले असून, जनावरांचे हाल होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्याचे भूगर्भ क्षेत्र खारेपाणी व गोडे पाणी पट्ट्यात विभागले गेले आहे. खारपाणपट्ट्यासह तालुका व शहराला वान धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. तालुक्यातील ८४ खेडी योजनेंतर्गत पाणी पुरवठा सुरू आहे. अनेक गावातील जलकुंभ पांढरे हत्ती ठरले आहेत. त्यामुळे वानचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून गावा-गावातील जलकुंभ न चढविता थेट नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. तालुक्यातील गोड पाणी पट्ट्यात वान धरणासह कूपनलिकातून उपसा करून घशाची तहान भागविण्यात येते. परंतु, खारपाणपट्ट्यात असलेल्या नागरिकांना वान धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. विशेष म्हणजे पाणी खारे असल्याने जनावरांचे आरोग्य लक्षात घेता जनावरांची तहानही गोडे पाण्याने भागविण्यासाठी वानधरणातील पाणी वापरतात. (फोटो)

जलवाहिनी लिकेज होण्याचे प्रमाण वाढले!

शहरात मुबलक पिण्याचे पाणी आहे. परंतु वान धरणातून पुरवठा करणारी जलवाहिनी वारंवार लिकेज होत असल्याने पाण्याची मोठी नासाडी होते. अनेक ठिकाणी व्हॉल्व्हला गळती लागत आहेत. त्यामुळे मुबलक पाणी असूनही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. खारपाणपट्ट्यात काही गावांमध्ये पाणी पोहोचत नाही. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. गुरांच्या पाण्यासाठी तयार धर्माळ कोरडी पडल्यामुळे जनावराची भटकंती होत आहे.

मान्सून पूर्व कपाशी लागवड

तालुक्यात पोपटखेड प्रकल्प, शहापूर (रुपागढ) प्रकल्प, पणज शहापूर प्रकल्प, खिरकुड तलाव धरण शेतीसाठी पाणी आरक्षित आहे. त्यामुळे सातपुडा पायथ्याशी मे महिन्यातच मान्सूनपूर्व कपाशी लागवड करण्यात आली आहे.

पारा चढला, उपाययोजनांची कामे संथ गतीने!

जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई उपाययोजनांच्या आराखड्यात तालुक्यात ५४ गावांसाठी ९७ उपाययोजना प्रस्तावित आहेत. त्यामध्ये ४२ गावात कूपनलिका, १५ गावात विंधन विहिरी, २३ गावात विशेष नळ योजना दुरुस्ती, १५ विहिरी अधिग्रहण तर २ विहिरीतील गाळ काढण्याची कामे जानेवारी ते जून पर्यंतच्या कालावधीत करण्यासाठी नमूद केली आहेत. मात्र, अद्याप तरीही उन्हाळ्यात पारा चढला, तरी उपाययोजनांच्या कामाला गती मिळाली नसल्याची स्थिती आहे.

या यंत्रणेद्वारे होतो पाणीपुरवठा

अकोट तालुक्यातील १४२ गावे आहेत. तर ७९ ग्रामपंचायती आहेत. वान धरणातून ८४ खेडी योजनाअंतर्गत पाणीपुरवठा होत असला तरी ४३ गावात ६३ स्वतंत्र नळयोजना आहेत. तसेच २० गावात ३१ लघु नळ योजना आहेत. ११ गावात १० महाजल योजना आहेत. जलस्वराज्य योजना ७ गावात कार्यान्वित असून हातपंप आहेत, अशी पाणीपुरवठा करणारी यंत्रणा आहे.

Web Title: Rivers and streams dry; Artificial water scarcity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.