रस्त्यावर बांधकाम साहित्य; नोटीस जारी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 02:21 PM2019-06-08T14:21:11+5:302019-06-08T14:21:56+5:30
संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सूचना महापौरांनी केली आहे.
अकोला: शहराच्या कानाकोपºयात चक्क रस्त्यांवर अस्ताव्यस्त ठेवलेले बांधकाम साहित्य अकोलेकरांच्या जीवावर उठल्याच्या वृत्ताची दखल घेत महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्यासह उपस्थित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले. संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सूचना महापौरांनी केली आहे. महापौरांच्या निर्देशांचे प्रशासन कितपत पालन करते, याकडे अकोलेकरांच्या नजरा लागल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात बांधकाम करण्यासाठी मनपाच्या नगररचना विभागाची परवानगी आवश्यक आहे. इमारतीचे बांधकाम करताना बांधकाम साहित्य खुल्या किंवा सार्वजनिक जागेमध्ये ठेवता येत नाही. खासगी जागेवर टिनाचे शेड उभारून त्या ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणे क्रमप्राप्त आहे. नगररचना विभागाचे सर्व निकष-नियम पायदळी तुडवित अकोलेकरांनी चक्क रस्त्यांवरच बांधकाम साहित्य ठेवण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसून येते. बांधकाम सुरू असणाºया इमारतीसमोरील रस्त्यावर विटा, गिट्टी तसेच रेतीचे ढिगारे लावल्या जात आहेत. हा विचित्र प्रकार वाहनधारकांच्या जीवावर उठला असून, अनेकांवर अपघातग्रस्त होण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात मालमत्ताधारकांना हटकल्यास वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. यासंदर्भात शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त उमटल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी त्यांच्या दालनात घेतलेल्या आढावा बैठकीत उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, विठ्ठल देवकते, प्रशांत राजूरकर यांच्यासोबत चर्चा केली. संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे निर्देश महापौर अग्रवाल यांनी दिले आहेत.
आरोग्य निरीक्षकांनी घेतले झोपेचे सोंग!
प्रभागातील दैनंदिन साफसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. प्रभागात निर्माण होणारे अतिक्रमण, अस्वच्छता यावर करडी नजर ठेवण्याची आरोग्य निरीक्षकांची ‘ड्युटी’ आहे. रस्त्यांवरील बांधकाम साहित्य प्रकरणी मालमत्ताधारकांकडून दंड वसूल करता येतो. आजवर आरोग्य निरीक्षकांनी अशा किती कारवाया केल्या, याची झाडाझडती उपायुक्तांसह क्षेत्रीय अधिकाºयांनी घेणे गरजेचे आहे.
उपायुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाºया मालमत्ताधारकांना दंड आकारण्याचे निर्देश यापूर्वी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी क्षेत्रीय अधिकाºयांना दिले होते. आयुक्तांच्या निर्देशाला पायदळी तुडविल्यानंतर आता महापौरांनी त्याच स्वरूपाचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त प्रमोद कापडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.