मूर्तिजापूर तालुक्यातील रस्त्यांचा बोजवारा, वाहनचालकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 02:17 PM2019-09-07T14:17:06+5:302019-09-07T14:18:37+5:30
तीन वर्षांपूर्वी निकृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा पार बोजवारा उडाला आहे.
- संजय उमक
मुर्तिजापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दैनावस्था झाली असून रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. तीन वर्षांपूर्वी निकृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा पार बोजवारा उडाला आहे.
तालुक्यातील मूर्तिजापूर - हिरपूर, आसरा, रोहणा, ब्रम्ही, ७ नंबर नाका ते भटोरी, चिखली, सोनाळा, गौरखेडी, वाई माना, पिंपरी मोडक, बल्लारखेड, माना, जामठी कर्ली कामरगाव हे तीन वषार्पूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले रस्ते पुर्णपणे उखडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज घेता येत नसल्याने व खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात रोज अपघात घडतात. या संदर्भात अनेक निवेदने देऊनही रस्ते दुरुस्त होत नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
सन २०१५-१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या भटोरी-मंगरुळकांबे-जितापूर- मूर्तिजापूर , रोहणा-
ब्रम्ही-हिरपूर-मूर्तिजापूर , सोनाळा-गैरखेडी-वाई-माना-पिंप्रीमोडक, बल्लारखेड-माना-जामठी-कार्ली-कामरगाव- हे जवळपास ६०किलोमीटर रस्ते सद्यस्थितीत खड्डेमय झाले आहे. या संदर्भात शेलू नजीक सरपंचांनी ७ जानेवारी रोजी एक निवेदनही सादर केले; परंतू प्रशासनाला जागच येत नसल्याची बाब समोर आली आहे. ३० आक्टोबर २०१५ रोजी भटोरी रस्त्याचे भूमिपूजन करुन नंतरच्या १३ किलोमीटरचा रस्ता पुर्ण करण्यात आला मात्र तीन वर्षांच्या कालावधीतच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्याचे काम निकृष्ट दजार्चे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उपरोक्त रस्त्यासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत मंजूरातही मिळाली आहे. त्यात ६० किलोमीटरच्या वर लांबीच्या रस्त्याचा समावेश आहे. यासाठी ६ कोटी रुपयांच्या वर खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे.
आमदार पिंपळे यांचे पत्र
मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी तालुक्यातील रस्ते दुरुस्त करण्यात यावे यासाठी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला यांना २३ जुलै रोजी पत्र देऊन नॉन प्लॅन योजने अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाला मंजुरात देऊन रस्ते दुरुस्त करण्यात यावे या आशयाचे पत्र दिले आहे.