राजेश्वर सेतू ते सरकारी बगिचा रस्त्याचे होणार रंदीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 02:03 PM2018-12-14T14:03:07+5:302018-12-14T14:03:19+5:30
खोलेश्वर ते सरकारी बगिचापर्यंत २४ मीटर रुंद रस्त्यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी पुढाकार घेत ३ हजार ७०५ मीटर अंतर जागेचा तिढा निकाली काढला.
अकोला: जुने शहरात जाण्यासाठी प्रशस्त रस्ते नसल्यामुळे या भागात वाहतूक कोंडी नित्याचा भाग झाला होता. त्यावर तोडगा म्हणून आमदार गोवर्धन शर्मा यांनी किल्ला चौक ते शंकरलाल जीनपर्यंत राजेश्वर सेतूचे निर्माण केले. खोलेश्वर ते सरकारी बगिचापर्यंत २४ मीटर रुंद रस्त्यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी पुढाकार घेत ३ हजार ७०५ मीटर अंतर जागेचा तिढा निकाली काढला असून, त्या बदल्यात लोहिया कुटुंबीयांना ‘टीडीआर’ देण्यात आल्याची माहिती आहे.
जुने शहरातील बहुतांश भागाचा गावठाणमध्ये समावेश होतो. त्यामुळे प्रशस्त रस्त्यांचा अभाव आहे. रस्ता रुंदीकरणाला वाव नसल्यामुळे लोखंडी पूल मार्गे जय हिंद चौक, काळा मारोती रोड, विठ्ठल मंदिर परिसरातून जाताना वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झाली आहे. वाहतुकीचा सर्वाधिक ताण लोखंडी पूल मार्गावर असल्यामुळे मोर्णा नदीवर पर्यायी पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली होती. ही बाब ध्यानात घेता आ. गोवर्धन शर्मा यांनी मोर्णा नदीच्या पात्रातून किल्ला चौक ते शंकरलाल जीनपर्यंत राजेश्वर सेतूचे निर्माण केले. त्यामुळे जुने शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या हरिहरपेठ, बाळापूर रोड, शिव नगरमधील वाहनधारकांना दिलासा मिळाला होता; परंतु शंकरलाल जीनपासून पुढे मनपाच्या मोटार वाहन विभागाच्या मुख्य रस्त्यावर येण्यासाठी वाहनधारकांना गल्लीबोळांमधून यावे लागत होते. वाहनधारकांची कुचंबणा लक्षात घेता आ. गोवर्धन शर्मा यांनी पुढाकार घेत राजेश्वर सेतू ते थेट शंकरलाल जीन ते सरकारी बगिचापर्यंत येणारा रस्ता अधिग्रहित केला. त्याकरिता लोहिया कुटुंबीयांचे मन वळवून २४ मीटर रुंद व ३ हजार ७०५ मीटर अंतराच्या रस्त्यासाठी जागा मिळविली. त्या बदल्यात लोहिया कुटुंबीयांना महापालिकेच्या माध्यमातून ‘टीडीआर’ उपलब्ध करून देण्यात आला.
‘टीडीआर’ म्हणजे काय?
रस्ता रुंदीकरण, नागरी हितासाठी ताब्यात घेतलेले भूखंड, आरक्षित भूखंड, सोसायट्यांमधील अॅमिनिटी स्पेस ताब्यात घेतल्यानंतर संबंधित जागा मालकाला मनपा प्रशासनाकडून ‘टीडीआर’ दिला जातो. त्याचा वापर जागा मालकाला त्याला गरज असेल तर त्याच्या इतर बांधकामावर वापरता येतो किंवा त्याची एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला विक्री करता येते; मात्र त्याला हद्दीचे बंधन आहे. महापालिकेला प्रत्येक वेळी आर्थिक नुकसान भरपाई देता येणे शक्य नसल्याने सरकारने हा ‘हस्तांतरणीय विकास अधिकार’(टीडीआर) निर्माण करून पालिकेच्या विकास कामांमध्ये अडथळा येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण केली आहे.
रस्त्यासाठी निधीची तरतूद
राजेश्वर सेतू ते शंकरलाल जीन ते सरकारी बगिचापर्यंत २४ मीटर रुंद रस्त्याचे निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी निधीची तरतूद केली आहे. मार्च २०१९ पर्यंत हा प्रशस्त रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला होणार असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.