अकोल्यात ‘रोड शो’ ने वाढविला फुटबॉल फीव्हर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:21 AM2017-09-15T01:21:59+5:302017-09-15T01:22:14+5:30
प्रत्येक पाऊल..इतिहास घडवेल..फुटबॉल वेड. . नसानसात ठसेल.., हे घोषवाक्य घेऊन अकोलेकर फुटबॉलप्रेमींनी गुरुवारी शहरातील मुख्य मार्गाहून फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार केला. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा)च्यावतीने ९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत भारतात १७ वर्षांखालील मुलांसाठी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे.
नीलिमा शिंगणे-जगड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रत्येक पाऊल..इतिहास घडवेल..फुटबॉल वेड. . नसानसात ठसेल.., हे घोषवाक्य घेऊन अकोलेकर फुटबॉलप्रेमींनी गुरुवारी शहरातील मुख्य मार्गाहून फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार केला. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा)च्यावतीने ९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत भारतात १७ वर्षांखालील मुलांसाठी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतात सहा राज्यांमध्ये स्पर्धेतील सामने होणार आहेत. यामधील सहा सामने महाराष्ट्रातील नवी मुंबईत होणार आहेत. याकरिता महाराष्ट्र शासन अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होण्याकरिता ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’, ही योजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारी आरोग्य अन् आनंदासाठी फुटबॉल प्रत्येक नागरिकांनी खेळावा, हा संदेश देण्यासाठी फुटबॉल ‘रोड शो’चे आयोजन केले होते. यामध्ये अकोला जिल्हय़ातील फुटबॉलचे रथी-महारथी सहभागी झाले होते, तसेच २५0 च्यावर फुटबॉल खेळाडूंनी रस्त्यावर फुटबॉल खेळला.
जिल्हा स्तर मिशन फुटबॉल आयोजन समितीच्यावतीने ‘रोड शो’चे नियोजन करण्यात आले. माजी क्रीडा राज्यमंत्री अजहर हुसैन यांच्या हस्ते ‘रोड शो’ला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी केले. ‘रोड शो’चे संचालन प्रा.जमील अहमद यांनी केले. यावेळी जागतिक स्तराच्या फुटबॉल खेळाडूंचे कटवर्क पोस्टरने सजविलेल्या रथामध्ये अकोल्यातील फुटबॉलचे महारथी विराजमान झाले होते. अजहर हुसैन यांच्यासह वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे वली मोहम्मद, ज्येष्ठ फुटबॉलपटू देवीदास सज्रेकर, सुरेश निंबाळकर रथात बसले होते. ‘रोड शो’मध्ये क्रीडा संघटक जावेद अली, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील, बुढण गाडेकर, अब्दुल रऊफ, अनिस गौरवे, इलियास खान, जमील अहमद, जमील खान, सलीम खान, महेबुब खान, नईम खान, इरशाद खान, शहीद खान, रमेश शेलार, गजानन शेलार, अन्जार कुरेशी, इरशाद खान, शेख गणी, इम्रान खान, सईद खान, जाकीर लोधी, लक्ष्मीशंकर यादव, प्रशांत खापरकर, श्याम देशपांडे, रवींद्र धारपवार, राजू उगवेकर, निशांत वानखडे, सहदेव वानखडे यांच्या नेतृत्वात ‘रोड शो’ पुढे चालला होता.