रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीत जिल्हाभरात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:50 AM2017-07-31T02:50:08+5:302017-07-31T02:50:14+5:30
अकोला: भ्रष्टाचाराचे कुरण म्हणजे वृक्ष लागवड करण्याचे काम, असे समीकरणच सध्या तयार झाले आहे. रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करणाºया सामाजिक वनीकरण विभागाने रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी कार्यालयास गेल्या दोन वर्षांतील कामांची माहितीच दिली नसल्याचा प्रकार घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: भ्रष्टाचाराचे कुरण म्हणजे वृक्ष लागवड करण्याचे काम, असे समीकरणच सध्या तयार झाले आहे. रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करणाºया सामाजिक वनीकरण विभागाने रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी कार्यालयास गेल्या दोन वर्षांतील कामांची माहितीच दिली नसल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे किती झाडे जगली, त्यातून काय साध्य झाले, याची साधी आकडेवारीही रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही. त्यातून प्रचंड भ्रष्टाचार उघड होण्याची भीती सामाजिक वनीकरण विभागाला आहे.
विशेष म्हणजे, सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या काही वर्षांत रस्ता दुतर्फा केलेल्या वृक्ष लागवडीची माहिती तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी सातत्याने मागविली. त्यासाठी दोन वर्षांत अनेक स्मरणपत्रे दिली; मात्र रोजगार हमी योजनेतून केलेल्या या कामाची कुठलीच माहिती या विभागाने उपजिल्हाधिकाºयांना दिलेली नाही. रॅण्डमली रस्ता दुतर्फा लागवड केलेल्या रोपांची पाहणी करावयाची झाल्यास कोणतीच माहिती त्या कार्यालयात नाही. त्यामुळे कोणत्या कामांची प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन चौकशी करणे, रोजगार हमी योजना विभागाला शक्य झालेले नाही.
रोपे जिवंत नसतानाही दिले जाते पाणी
रोजगार हमी योजनेच्या ६०:४० प्रमाणात जलसंधारणाचे काम म्हणून वृक्ष लागवड सर्वात सोपे आणि कमाई करून देणारे काम आहे. या वृक्ष लागवडीची कामे कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभागाकडे मोठ्या प्रमाणात दिली जातात. काही कामे ग्रामपंचायतीकडूनही केली जातात. या कामासाठी वर्षनिहाय टप्प्यानुसार आणि मजुरांच्या उपस्थितीच्या प्रमाणात रक्कम काढली जाते. त्यामध्ये बोगस मजूर दाखवणे, रोपे जिवंत नसताना पाणी देणे, यासारखी कामे सातत्याने केली जातात. गेल्या दोन वर्षांत काही रोजगार सेवकाच्या मध्यस्थीने मजुरांच्या नावे रक्कम काढून त्यातील काही हिस्सा मजुराला देत हडप करण्याचे प्रकारही घडले आहेत.
रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीचा बोजवारा
सामाजिक वनीकरण विभागाकडून कामांची माहितीच रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्ता दुतर्फा केलेल्या रोपे लागवडीच्या कामाची सद्यस्थिती काय आहे, रोपे जिवंत आहेत की नाही, याची माहिती रोजगार हमी योजना कार्यालयात नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आॅक्टोबर २०१६ पूर्वी केलेल्या लागवडीच्या कामांचा बोजवारा उडाल्याची शंका आहे. सद्यस्थितीत पातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी केलेला वृक्ष लागवडीचा घोटाळा गाजत आहे. सामाजिक वनीकरण विभागाचीही झाडाझडती घेतल्यास मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.
रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीची माहिती सामाजिक वनीकरण विभागाला सातत्याने मागविली. रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी (अकोला) पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतरच्या काळात ती मिळाली असेल, तर उद्या सोमवारी त्याबाबत संबंधितांकडून माहिती घेऊन सांगता येईल.
- प्रमोदसिंह दुबे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी, रोहयो.