रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत; बांधला नगर परिषदेने!
By admin | Published: March 7, 2016 02:37 AM2016-03-07T02:37:58+5:302016-03-07T02:37:58+5:30
मूर्तिजापूर शहरातील प्रकार;सखोल चौकशीची मागणी.
गणेश मापारी / मूर्तिजापूर (जि. अकोला)
सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमिपूजन केलेल्या रस्त्यावर चक्क नगर परिषदेने बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर नगर परिषदेने बांधकाम केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
ग्रामीण भागातील रस्त्यासह शहरातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. असे असतानाही निधीअभावी अनेक रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. मूर्तिजापुरात मात्र एकच रस्ता दोन विभाग बांधणार काय, असा प्रश्न एका प्रकारामुळे उपस्थित करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रोहणा, हिरपूर, मूर्तिजापूर, सोनाळा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली.
१४ किमी असलेल्या या प्रमुख जिल्हा मार्गासाठी १ कोटी २0 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर रस्त्याचे भूमिपूजन लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूर्तिजापूर उपविभागाकडून रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच नगर परिषदेने ५00 मीटरच्या लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले. हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आला. या विभागाने न. प. ने केलेले बांधकाम तोडण्याबाबत मुख्याधिकार्यांनी पत्रव्यवहार केला आहे.