हातोला येथील रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:17 AM2021-04-11T04:17:52+5:302021-04-11T04:17:52+5:30
निहिदा : बार्शीटाकळी पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या हातोला येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात दलित वस्तीमध्ये सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे ...
निहिदा : बार्शीटाकळी पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या हातोला येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात दलित वस्तीमध्ये सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे नसून, निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य वैभव विठ्ठलराव हातोलकर, विठ्ठलराव बोचरे यांनी बीडीओंकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.
हातोला येथील ग्रामपंचायत सदस्य वैभव हातोलकर यांनी बीडीओंकडे दिलेल्या तक्रारीनुसार, हातोला येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने दलित वस्तीमध्ये रस्त्याचे काम करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम खोदकाम न करता सुरू करण्यात आले आहे. रस्ता कामासाठी वापरत असलेले सर्व साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसून, रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. रस्त्याचे कंत्राट दादाराव सुरडकर यांनी घेतला असून, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अनिता भगत यांच्याकडे देखरेख आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट होत असून, कामाची पाहणी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीचे सदस्य वैभव विठ्ठलराव हातोलकर, विठ्ठलराव बोचरे, आदी ग्रामस्थांनी केली आहे.
-------------------------
हातोला येथील तक्रार प्राप्त झाली आहे. रस्ताकामाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- किशोर काळबांडे, गटविकास अधिकारी, बार्शीटाकळी.