मुख्यंमत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम अर्धवट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:44+5:302021-04-04T04:18:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निहिदा : पिंजर परिसरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम गत तीन ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
निहिदा : पिंजर परिसरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे काम गत तीन ते चार वर्षांपासून अर्धवट स्थितीत असल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक वैतागले आहेत. रस्त्यावर गीट्टी, मुरुम टाकल्याने या मार्गाने प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पिंजर परिसरातील खोपडी-मालशेलू, पिंजर-निहिदा, निहीदा-सावरखेड फाटा या रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून पिंजर परिसरातील खोपडी-मालशेलू, पिंजर-निहिदा, निहिदा-सावरखेड फाटा रस्त्यांचे काम अपूर्ण असून, या रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी देऊनही परिस्थिती जैसे थे असल्याने ग्रामस्थांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. निहिदा-पिंजर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत सरपंच मीना अविनाश ठाकरे, माजी सरपंच विजय पाटील-ठाकरे, बहिरखेडच्या सरपंच कविता किरण पाटील-ठाकरे यांनी तक्रारी केल्या; मात्र सद्यस्थितीतही काम जैसे थे आहे. खोपडी-मालशेलू रस्त्याची तक्रार प्रदीप राठोड, पिंजर-बार्शीटाकळी रस्त्याची तक्रार शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील-मानतकर यांनी केली असल्याची माहिती आहे. रस्त्यांचे काम चांगल्या दर्जाचे करून त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना संपर्क केला असता, होऊ शकला नाही.
---------------------------------------
पिंजर-निहिदा रस्त्याचे काम चार वर्षांपासून अपूर्ण आहे. याबाबत तक्रारी केल्या; मात्र कारवाई झाली नाही. अपूर्ण रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
- मीना अविनाश ठाकरे, सरपंच, निहिदा.
---------------------------------------
पिंजर मंडलामधील रस्त्यांचे काम आतापर्यंत पूर्ण करायला हवे होते. रस्त्यांचे काम निकृष्ट झाले असेल तर चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- प्रदीप खवले, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, अमरावती.
---------------------------------------------------------
खोपडी - मालशेलू रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. याबाबत तक्रार करूनही चौकशी करण्यात येत नाही. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
- प्रदीप राठोड, ग्रामस्थ, मालशेलू.