अडवलेले शेतीच्या वहिवाटीचे रस्ते होणार मोकळे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 02:00 PM2019-05-05T14:00:06+5:302019-05-05T14:00:15+5:30
अकोला : शेतात जाणे-येणे करण्यासाठी शेतरस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह शेतीच्या वहिवाटीचे अडवलेले रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचा अभिनव उपक्रम अकोला तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला : शेतात जाणे-येणे करण्यासाठी शेतरस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह शेतीच्या वहिवाटीचे अडवलेले रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचा अभिनव उपक्रम अकोला तालुक्यात राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय लोखंडे यांनी २ मे रोजी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शेतीच्या वहिवाटीचे अडवलेले रस्ते मोकळे होणार असून, शेतरस्त्यांचा मार्ग सुकर होणार आहे.
शेतात जाणे-येणे करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी तसेच शेतीच्या वहिवाटीचे अडवलेले रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तहसील कार्यालयाकडे अर्ज प्राप्त होतात. शेतरस्ता मागणीसाठी शेतकºयाने केलेला अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार मंजूर करण्यात येतो; तसेच शेतीच्या वहिवाटीचा अडविलेला रस्ता मोकळा करण्यासाठी मामलतदार अधिनियम १९०८ चे कलम ५ नुसार तरतूद आहे; परंतु शेतीसाठी नवीन रस्ता मागणीसाठी आणि अडविलेला वहिवाटीचा रस्ता मोकळा करण्याकरिता शेतकºयांना तहसील कार्यालयात अर्ज करण्यापासून ते प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतरस्ता मागणीसाठी आणि अडवलेले शेतीच्या वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासाठी प्राप्त झालेले अर्ज तातडीने निकाली काढण्याचा उपक्रम अकोला तालुक्यात राबविण्यात येणार असल्याचे परिपत्रक अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी २ मे रोजी काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतरस्त्यांचा मार्ग सुकर होणार आहे.
अशी होणार कार्यवाही !
शेतीसाठी रस्ता मागणीकरिता प्राप्त अर्जांची संबंधित महसूल मंडळ अधिकारी चौकशी करून प्रत्यक्ष मोक्याच्या ठिकाणी जातील आणि मंडळ अधिकारी व तलाठी शेतीच्या वहितीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करतील. यासंदर्भात पंचनामा तयार करून संबंधितांना देण्यात येणार आहे, तसेच अडविलेली शेतीची वहिवाट मोकळी करण्यासंदर्भात अर्जदार व गैरअर्जदारांच्या समक्ष मंडळ अधिकारी व तलाठी स्थळ निरीक्षण करतील आणि पंचनामा करून वहिवाट मोकळी करण्याची कार्यवाही करतील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे, असे तहसीलदारांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.