तेल्हारा तालुक्यात रोहित्र चोरीचा पुन्हा सपाटा
By admin | Published: May 3, 2017 07:26 PM2017-05-03T19:26:49+5:302017-05-03T19:26:49+5:30
वानच्या ११९ कूपनलिका ठरताहेत निकामी
तेल्हारा : वान प्रकल्पाचे पाणी ज्या शेतशिवारात पोहोचत नाही, तेथे लघुसिंचन विभागाने ११९ कूपनलिका केल्या. त्याकरिता २५ क्षमतेचे ६५ रोहित्र बसविले होते. त्यातील दोन सोडता सर्वच रोहित्र चोरीला गेले. पुन्हा त्या जागी लावण्यात आलेल्या नवीन रोहित्र चोरीचा सपाटा सुरू आहे. यामधील १० रोहित्र पुन्हा चोरीला गेले. तपास मात्र शून्य आहे.
तालुका बागायती क्षेत्रात मोडत असल्याने सिंचन जास्त प्रमाणात आहे. या ठिकाणी सिंचन करण्यासाठी शेतकरी मोठ्या पोटतिडकीने मेहनत घेताना दिसतो. हनुमान सागर नावाने ओळखल्या जाणाऱ्या वान प्रकल्पाने या भागात हरितक्रांती केली आहे. त्याद्वारे मागणीनुसार नेहमी सिंचनासाठी पाणी देण्यात येते व ज्या भागात पाटसऱ्यांचे पाणी पोहोचत नाही, त्या शेतशिवारात वान प्रकल्पाने लघुसिंचन विभागाकडून ११९ कूपनलिका करून दिल्या. एका कूपनलिकेवर २० एकर बागायती क्षेत्र क्षमतेचे सिंचन होते. याकरिता विद्युत विभागाकडून २५ क्षमतेचे ६५ रोहित्र बसविले; परंतु गेल्या तीन वर्षांत चोरांनी सर्वाधिक रोहित्र चोरून नेले. चोरीला गेलेल्या रोहित्राचा तपास लागला नाही. याबाबत तत्कालीन आमदार संजय गावंडे यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न विचारला होता. तो चांगलाच गाजला होता. त्यानंतर चोरीला गेलेल्या रोहित्राचा निधीसुद्धा मंजूर झाला व आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हा प्रश्न गंभीरतेने घेतल्याने पुन्हा रोहित्र बसविले गेले; मात्र नव्याने लावण्यात आलेल्या रोहित्रामधील १० रोहित्र या आठवड्यातच चोरीला गेले. यामध्ये ग्रामीण भाग दोनमधील सहा व ग्रामीण भाग एकमधील चार रोहित्रांचा समावेश आहे. तेल्हारा व हिवरखेड पोलीस स्टेशनांतर्गत झालेल्या या चोरीचा तपास मात्र अद्याप सुरूच आहे. रोहित्र चोरी गेल्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते,याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतशिवारातीलच रोहित्र चोरीस गेली आहेत व जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.