वानखेडपूर शिवारातील रोहित्र एक वर्षापासून बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:17 AM2021-04-05T04:17:22+5:302021-04-05T04:17:22+5:30
बार्शीटाकळी : तालुक्यातील सोनगिरी रस्त्यावरील वानखेडपूर शिवारातील रोहित्र तब्बल एक वर्षापासून बंद असल्याने पाणी असूनही विजेअभावी शेतकऱ्यांना पिके घेता ...
बार्शीटाकळी : तालुक्यातील सोनगिरी रस्त्यावरील वानखेडपूर शिवारातील रोहित्र तब्बल एक वर्षापासून बंद असल्याने पाणी असूनही विजेअभावी शेतकऱ्यांना पिके घेता आली नाहीत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणने तत्काळ दखल घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी महिवतरणला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सोनगिरी रस्त्यावरील वानखेडपूर येथील रोहित्र जळाल्याने एक वर्षापासून बंद आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. शेतकरी दरवर्षी रब्बी पिके तसेच उन्हाळी पिके घेतात. मात्र यंदा रोहित्र जळाल्याने पाणी असूनही शेतकरी पिकांना पाणी देऊ शेकले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीही केली नाही. रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. रोहित्र दुुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी दिल्या मात्र समस्या जैसे थे असल्याने शेतकरी वैतागले आहे. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदने देऊन दोन दिवसांत रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. निवेदनावर युनूस मो. आझम, कादिर खान मोहम्मद खान, ए. आसिफ ए. कादिर, आशा सुधाकर ढोरे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.