चंद्रपूरच्या घटनेत पाेलिसांची भूमिका संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 11:00 AM2021-08-24T11:00:09+5:302021-08-24T11:00:29+5:30
Rekha Thakur : पोलिसांची भूमिका संशयास्पद व पक्षपाती असल्याचा आराेप वंंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्र परिषदेत केला.
अकाेला : चंद्रपूरच्या जिवती येथून १२ किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेची कुठेही वाच्यता झाली नाही. किती लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, कुणाला अटक करण्यात आली का, याबाबत काहीही माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला. बाहेरच्या व्यक्तींना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद व पक्षपाती असल्याचा आराेप वंंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्र परिषदेत केला.
स्थानिक विश्रामगृह येथे आयाेजित पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. त्या म्हणाल्या की, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणावरून दलितांवरील अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाही हेच स्पष्ट हाेते. या घटनेत तर पाेलीसच पक्षपाती वागत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाची पूर्ण चाैकशी करून दाेषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बाॅक्स...
मदत वाटपात दुजाभाव, स्वतंत्र विदर्भच हवा !
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भात विक्रमी पाऊस होतोय. या ढगफुटीमुळे भंडारा, नागपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात महापूर आला आहे. तब्बल २७ वर्षांनंतर विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील पुरासाठी ९०० कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आणि केंद्राने केवळ १५१ कोटी दिल्याचे राज्य सरकार सांगते. या प्रकारावरून विदर्भातील अन्याय कायम असल्याचे दिसत आहे. विदर्भातील असमतोल आणि समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य आवश्यक असून सध्या सुरू असलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या आंदाेलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. याेग्य वेळी या आंदाेलनात कृतीयुक्त सहभागही नाेंदविणार असल्याच्या त्या म्हणाल्या.