दोन हजारांवर पोलिसांचा रूट मार्च; वाहनांचाही मोठा ताफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:02 PM2019-04-17T14:02:26+5:302019-04-17T14:02:46+5:30
अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून, पोलिसांकडूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून, पोलिसांकडूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मंगळवारी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील दोन हजारांवर पोलिसांनी शहरात शक्तिप्रदर्शन केले.
पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी सर्वांनी निर्भीडपणे मतदान करावे, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, काही अनुचित प्रकार आढळून आल्यास पोलीस स्टेशनला किंवा नियंत्रण कक्ष येथे त्वरित माहिती द्यावी, आदर्श आचारसंहितेचे पालन करावे तसेच जिल्ह्यातील प्रत्येकाने जागृत नागरिकाचे कर्तव्य बजावून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. पोलिसांनी केलेल्या पथसंचलनामध्ये पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, शहरातील ठाणेदार पोलीस अधिकारी, केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगा काबू पोलीस पथक, शीघ्र प्रतिसाद पथक, होमगार्ड पथक, मध्य प्रदेश पोलीस, नाशिक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला. हे पथसंचलन पोलीस मुख्यालय येथून सुरू झाल्यानंतर वाशिम बायपास, किल्ला चौक, भांडपुरा चौक, दगडी पूल, आपातापा चौक उमरी, सिव्हिल लाइन चौक, शिवणी, शिवर, तुकाराम चौक, सिंधी कॅम्प, अशोक वाटिका, टॉवर चौक, गांधी चौक, सराफा चौक, कोतवाली चौक येथून गणेश घाट येथे समारोप करण्यात आला.