गुलाब चक्रीवादळामुळे विदर्भात अलर्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:32+5:302021-09-26T04:21:32+5:30
पुढील तीन-चार दिवस या वादळाचा प्रवास ओरिसा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा, झारखंड, पूर्वी मध्यप्रदेश आणि राज्याला प्रभावित करीत पूर्ण होताना ...
पुढील तीन-चार दिवस या वादळाचा प्रवास ओरिसा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा, झारखंड, पूर्वी मध्यप्रदेश आणि राज्याला प्रभावित करीत पूर्ण होताना दिसून येत आहे. वादळाच्या प्रभावामुळे नमूद प्रदेशासोबत विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचे अनुमान आहे. यामध्ये पूर्व विदर्भात नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून, २७-२८ तारखेदरम्यान, पश्चिम विदर्भासोबत मराठवाडा विशेषत: तेलंगाणा सीमा परिसरात जोरदार पावसाचे संकेत आहेत. हे वादळ पूर्व ते पश्चिम असा प्रवास पूर्ण करण्याचे संकेत हवामान विभागाने दिले. परिणामी, सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जालना, औरंगाबाद, नाशिक आणि लगतच्या जिल्ह्यात पूर्व ते पश्चिम, अती ते मध्यम स्वरूपात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही परिणाम
पुणे विभागात सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपात साधारणपणे २८-२९ सप्टेंबर रोजी या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. विशेषत: कर्नाटक सीमा परिसरातील तालुक्यांत तो ठळकपणे राहील, इतर ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस सक्रिय राहण्याचे अनुमान आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पाऊस होऊ शकतो. रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक
शेतकऱ्यांनो, काळजी घ्या!
चक्रीवादळामुळे राज्यात दमदार पाऊस होईल. सुरुवातीला पेरणी झालेले सोयाबीन काढणीला आले आहे. कपाशीची वेचणीही सुरू झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज आहे.
वऱ्हाडात जोर कमी राहणार!
गुलाब चक्रीवादळ पूर्व ते पश्चिम असा प्रवास करणार आहे. त्यामुळे वऱ्हाडापर्यंत येताना वादळाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे; परंतु वाऱ्यांचा वेग कायम राहल्यास मध्यम ते दमदार पाऊस होऊ शकतो.