रोटी अभियानातून रुग्णांच्या नातेवाइकांना भरवितात मायेचा घास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:43+5:302021-06-03T04:14:43+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोरगरिबांना कामे सोडून रुग्णालयात भरती राहण्याची वेळ आली. यावेळी कोरोना रुग्णांची जेवणाची व्यवस्था होत आहे. मात्र, ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोरगरिबांना कामे सोडून रुग्णालयात भरती राहण्याची वेळ आली. यावेळी कोरोना रुग्णांची जेवणाची व्यवस्था होत आहे. मात्र, रुग्णांच्या काळजीपोटी दिवस-रात्र दवाखान्यात थांबणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांना जेवणाची अडचण निर्माण होत आहे. आर्थिक चणचण असल्याने दररोज जेवणाचा खर्च भागविणे कठीण होत आहे. अनेकजण उपाशीपोटीच झोपत आहेत. या गरजूंना उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये, याकरिता सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी बच्चू कडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रहार रोटी अभियान सुरू केले आहे. ते रोज सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात स्वत:च्या पैशातून दररोज अडीचशे गरजूंना अन्नदान करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणात गरजूंची भूक भागविण्याचे काम सुरू आहे. कोरोनाकाळात हे अभियान अविरत चालू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.
या अभियानाच्या माध्यमातून गरजूंना पौष्टिक अन्न देण्याचा प्रयत्न आहे. सकाळी भरपूर लोक अन्नदान करतात; परंतु सायंकाळी कोणी अन्नदान करत नाही. कोणीच उपाशीपोटी झोपू नये, यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला.
- मनोज पाटील
ही सर्वांची लढाई
कोरोना ही एकट्यादुकट्याची नव्हे तर सर्वांनी मिळून लढण्याची लढाई आहे. त्यामुळे या कार्यात सरपंच भौरद रोहित गावंडे, सागर भाकरे, श्याम क्षीरसागर, कैलास शिंदे, सय्यद नूर, कुणाल जाधव, संतोष हिरुळकर, शुभम ठाकूर, सुनील गोहर, परेश पाटील, तुषार उज्जैनकर, पिंटू साबळे, शुभम ढोले, यश गोहर, अभय डहाके व मास्टर पॉवर जीमचे मित्रमंडळ सहकार्य करीत आहे.
...तेव्हाच केला निश्चय!
काही दिवसांआधी मनोज पाटील यांची आई रुग्णालयात भरती होती. त्यावेळी त्यांच्या शेजारच्या गोरगरीब रुग्णांच्या नातेवाइकांचे जेवणासाठी होत असलेले हाल त्यांनी बघितले. ती व्यक्ती कधी एका कचोरीवर रात्र काढत असे, तर कधी उपाशीपोटी झोपत असे. त्यावेळी त्यांनी या गोरगरीब रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत अन्नदान करण्याचा निश्चय केला होता.
अभियानाला मिळतेय मदत
रोटी अभियानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे स्वखर्चातून सुरू असलेल्या या उपक्रमाला आता अनेक दात्यांकडून मदत मिळत आहे. कोणी आर्थिक मदत करीत आहे, तर कोणी भाजीपाला व किराणा देत आहे.