कोथिंबीर शेतकऱ्यांकडून ३५ रुपये किलो, तर ग्राहकांच्या पदरात १५ रुपये पाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:21 AM2021-08-26T04:21:41+5:302021-08-26T04:21:41+5:30
अकोला : गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे भाव वाढले हाेते ; मात्र सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. तरीही ग्राहकांच्या ...
अकोला : गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे भाव वाढले हाेते ; मात्र सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. तरीही ग्राहकांच्या पदरात महागाईने भाजीपाला येत असल्याचे चित्र आहे. बाजारात कोथिंबीर व कारल्याचे भाव वाढले आहेत. ठोक बाजारत कोथिंबीर शेतकऱ्यांकडून ३५ रुपये किलोने विकत घेतले जाते, तर ग्राहकांच्या पदरात १५ रुपये पाव येत आहे. तसेच वांग्याचे भावही वाढल्याचे दिसून येत आहेत.
भाजी बाजारातील ठाेक भाव व चाैका-चाैकात, रस्त्यांच्या कडेला भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडील भाजीपाल्याच्या भावातील फरक हा दिसून येतो. मात्र शेतकऱ्यांकडून ग्राहकांकडे जाणाऱ्या भावात फरक दिसून येतो. दुसरीकडे आता श्रावण सुरू असल्याने उपवासाचे प्रमाण वाढत असतानाही बटाट्याचे भाव २० ते ३० रुपयांपर्यंत स्थिरावल्याचे दिसत आहे. दरम्यान टोमॅटोचे भाव कमी झाले असून, ठोक बाजारात १५० रुपयांना कॅरेट विक्री होत आहे.
भाजीपाला शेतकऱ्याचा भाव ग्राहकांना मिळणारा भाव
वांगी १५ रु (पाव ) २०
टोमॅटो १५० कॅरेट १५ (कि.)
भेंडी १०(कि.) २०(कि.)
चवळी शेंगा १५ (कि.) ३० (कि.)
कारले १५ (कि.) ६० (कि.)
कोथिंबीर ३५(कि.) ६० (कि.)
पालक ३० (कि.) ४० (कि.)
हिरवी मिरची १० (कि.) २० (कि.)
पत्ताकोबी १२ (कि) २०(कि.)
फुलकोबी ३० (कि.) ४०(कि.)
दोडके १५ (कि.) ४०(कि.)
---------------------------
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाजीपाला स्वस्तात घेतल्या जाते उलट ग्राहकांच्या पदरात महागात पडते. कधी-कधी बाहेर जिल्ह्यातून माल न आल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे सरासरी खर्च हा निघून जातो. मात्र नफा तिळमात्र मिळते.
-गणेश राऊत, शेतकरी, सांगळूद.
-------------------------------
ग्राहकांना परवडेना
देशात महागाई वाढली आहे. घरगुती गॅसचे दरही वाढल्याने घरगुती बजेट कोलमडले आहे. अशातच घराच्या परिसरात मिळणारा भाजीपाला ही महागल्याने आर्थिक अडचण वाढली आहे.
- ग्राहक
------------------------
भाजीपाल्याचे दर हे बाजारात वेगळे, तर घराभोवती विक्री होणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात खूप फरक असतो. भाजीपाल्याचे दर कमी करून ग्राहकांना दिलासा द्यावा.
-ग्राहक
-----------------------------
भावात एवढा फरक का?
सीजन व बाजारातील आवक पाहून भाजीपाला स्वस्त व महाग होतो. व्यापाऱ्यांनाही काही भाजीपाल्यात उरते, तरी काही कवडीमोल भावात विक्री केल्या जाते. कोथिंबीर, कारलेंचा वाढलेला भाव हा बाजारात आवक कमी झाल्याने वाढला आहे.
-सुनील काळे, व्यापारी.