कापूस व्यापाऱ्याकडील ६ लाख रुपये लुटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:20 AM2021-03-10T04:20:15+5:302021-03-10T04:20:15+5:30
आसेगाव बाजार येथील गोपाल बापुराव सानप यांच्या तक्रारीनुसार ते शरद गोपालराव पुंडकर यांच्यासोबत भागीदारीत शेतकऱ्यांजवळून कापूस व इतर धान्य ...
आसेगाव बाजार येथील गोपाल बापुराव सानप यांच्या तक्रारीनुसार ते शरद गोपालराव पुंडकर यांच्यासोबत भागीदारीत शेतकऱ्यांजवळून कापूस व इतर धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. गावातील शेतकऱ्यांचा कापूस त्यांनी घेतला होता. तसेच अकोट येथील संजय अकोटकार या जिनिंग मालकाला विकला होता. त्या मोबदल्यात अकोटकार यांनी शेतकऱ्यांच्या नावे ६ लाख ४६ हजार ९२० रुपयांचे धनादेश दिले होते. त्यानंतर अकोटकार यांनी ६ मार्च रोजी खात्यात पैसे नसल्याचे सांगून धनादेश न वटविता, रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी गोपाल सानप यांना बोलाविले. त्यानुसार ८ मार्च रोजी दुपारी दोन वाजता सानप एक कापसाची ट्राॅली घेऊन जिनिंगमध्ये पोहचले. या ठिकाणी कापूस विक्री करुन सांयकाळी ७ वाजता जिनिंग मॅनेजर संतोष कडे यांच्याजवळून ६ लाख ४६ हजार ९२० रुपये रोख रक्कम घेतली आणि दुचाकीने ताजनापूर-वडगाव मार्गे आसेगाव बाजारला निघाले. हमीद मास्तर यांच्या शेताजवळ हातात विळे घेतलेले व तोंडाला कापड बांधलेल्या चार अज्ञात इसमांनी, त्यांना रात्री ८.३० वाजता सुमारास अडविले. त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाईल व पिशवीमधील ६ लाख ४६ हजार ९२० रुपये रोख घेऊन पसार झाले. घटनेची माहिती त्यांनी मित्र व गावकऱ्यांना दिली. त्यानंतर रात्री पोलीस स्टेशनला माहिती देण्याकरिता सानप पोहोचले. परंतु घाबरलेले असल्यामुळे सानप यांना किती रक्कम लंपास झाली हे आठवत नसल्याने त्यांनी ९ मार्च रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.