आरटीई प्रवेश प्रक्रिया : प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ, प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना दिलासा
By Atul.jaiswal | Published: June 12, 2023 05:23 PM2023-06-12T17:23:54+5:302023-06-12T17:24:58+5:30
यामुळे अद्यापपर्यंत प्रवेश निश्चित न झालेल्या बालकांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.
अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई)अंतर्गत विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी राखीव असलेल्या जागांवर प्रवेशासाठी जाहीर झालेल्या पहिल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश १२ जून या मुदतीपर्यंत पूर्ण न झाल्याने आता प्रवेशासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत प्रवेश निश्चित न झालेल्या बालकांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आरटीईअंतर्गत वंचित दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव असलेल्या १९४६ जागांसाठी राज्य स्तरावर काढण्यात आलेल्या सोडतीत १९२४ बालकांची निवड करण्यात आली होती. प्रवेश निश्चित करण्यासाठी २५ एप्रिल ते २२ मे या कालावधीत तीन वेळा मुदतवाढ मिळूनही तांत्रिक अडचणींमुळे किंवा हवी असलेली शाळा न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील ५३० जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येऊन ४८४ बालकांची निवड करण्यात आली.
या बालकांच्या प्रवेशासाठी ३० मे ते १२ जून पर्यंत मुदत देण्यात आली. तथापी, तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रिया मंदावलेली असल्याने उर्वरित बालकांच्या प्रवेशााठी १९ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रतीक्षा यादीतील २०४ बालकांचे प्रवेश निश्चिती
जिल्ह्यात आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशाच्या जागांसाठी निवड झालेल्या १९२४ बालकांपैकी केवळ १३९४ बालकांचा अंतिम मुदतीपर्यंत प्रवेश निश्चित झाला होता. त्यामुळे प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येऊन ४८४ बालकांची निवड करण्यात आली. १२ जूनच्या सायंकाळपर्यंत केवळ २०४ बालकांचा प्रवेश निश्चित झाल्याची नोंद आरटीई पोर्टलवर आहे.