आरटीई प्रवेश प्रक्रिया : आरटीईसाठी अर्ज केला का? शुक्रवार शेवटचा दिवस, १९४६ जागांसाठी ५५९१ अर्ज
By Atul.jaiswal | Published: March 16, 2023 05:28 PM2023-03-16T17:28:19+5:302023-03-16T17:28:36+5:30
RTE Admission Process : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची ऑनलाइन अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची ऑनलाइन अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. राखीव असलेल्या जागांसाठी अर्ज करण्यासाठी शुक्रवार, १७ मार्च ही शेवटची तारीख असल्याने ज्यांनी आतापर्यंत अर्ज भरले नसतील, त्यांना घाई करावी लागणार आहे.
आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती-धर्मांतील विकलांग बालके आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी पात्र आहेत. यावर्षी जिल्ह्यातील १९० शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केलेली असून, या शाळांमध्ये १९४६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवार, १६ मार्चपर्यंत ५५९१ अर्ज दाखल झाल्याची नोंद आरटीई पोर्टलवर आहे. आरटीईअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ मार्च २०२३ पासून सुरू झाली असून शुक्रवार, १७ मार्च ही शेवटची तारीख आहे. शेवटच्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने संकेतस्थळाची गती मंदावण्याची शक्यता आहे.