आरटीई प्रवेश प्रक्रिया यावर्षीही रेंगाळणार!

By admin | Published: March 12, 2016 02:33 AM2016-03-12T02:33:20+5:302016-03-12T02:33:20+5:30

शिक्षण विभागात नियोजनाचा अभाव;नवीन तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत.

The RTE admissions process will linger this year too! | आरटीई प्रवेश प्रक्रिया यावर्षीही रेंगाळणार!

आरटीई प्रवेश प्रक्रिया यावर्षीही रेंगाळणार!

Next

खामगाव : शाळांची प्रवेश प्रकिया सुरू झाली असली तरी आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया राज्यातील काही जिल्हे वगळता अद्याप सुरू झालेली नाही. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचे नियोजन नसल्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रवेश प्रक्रिया रेंगाळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पूर्वनियोजित तारखेनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम आहे.
आरटीई अँक्ट २00९ मध्ये पारित झाला. यानुसार सर्व मान्यताप्राप्त अनुदानित-विनाअनुदानित शाळांनी पहिल्या वर्गात प्रवेश देताना २५ टक्के जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत, असा दंडक आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने यावर्षीदेखील आरटीईच्या प्रवेशासंदर्भात वेळापत्रक निश्‍चित केले होते. त्यानुसार २७ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत शाळांना आपली नोंदणी करणे आवश्यक होते, तर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ मार्चपासून सुरु होणार होती; मात्र दिलेल्या कालावधीत शाळांची नोंदणी वेबसाइटवरील तांत्रिक अडचणीमुळे अद्याप होऊ शकलेली नाही.
वेबसाइटवर नाशिक विभागाकरिता ३ मार्चपासून, तर रायगड जिल्ह्यात ११ मार्चपासून शाळांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. इतर जिल्ह्यांसाठी मात्र अद्याप तारीख देण्यात आलेली नाही. परिणामी पालक संभ्रमित झाले आहेत. एकीकडे शाळांनी त्यांची नियमित प्रवेश प्रकिया सुरू केली आहे. आरटीईत प्रवेश मिळण्याच्या अपेक्षेत असलेल्या पालकांपुढे मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. आरटीईत प्रवेशासाठी थांबलो, तर खुल्या पद्धतीने प्रवेश मिळण्याची तारीख निघून जाईल. त्यामुळे काय करावे, यावर्षी पालक संभ्रमित आहेत.

-प्रवेशासाठी तारीख निश्‍चित नाही
यापूर्वी शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी २७ फेब्रुवारी ते ९ मार्च ही तारीख दिली होती, तर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ मार्चपासून सुरू होणार होती; परंतु ११ मार्च उगवला तरी शाळांची नोंद होऊ शकलेली नाही. मग विद्यार्थ्यांनी प्रवेश करायचा केव्हा, हा प्रश्न कायम आहे. नवीन तारखा अद्याप घोषित केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल, याची प्रतीक्षा पालकांना आहे.

Web Title: The RTE admissions process will linger this year too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.