अकोला जिल्ह्यातील आणखी ६० बालकांना आरटीईची लॉटरी, तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर
By Atul.jaiswal | Published: July 19, 2023 01:44 PM2023-07-19T13:44:25+5:302023-07-19T13:44:38+5:30
तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेला बुधवार, १९ जुलैपासून प्रारंभ झाला असून, २८ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई)अंतर्गत विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी राखीव असलेल्या जिल्ह्यातील एकूण १९४६ जागांपैकी रिक्त राहिलेल्या जागांसाठी तिसऱ्या प्रतीक्षा यादीत ६० बालकांची निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेला बुधवार, १९ जुलैपासून प्रारंभ झाला असून, २८ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
आरटीईअंतर्गत नोंद केलेल्या जिल्ह्यातील १९० खासगी शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव असलेल्या १९४६ जागांसाठी राज्य स्तरावर काढण्यात आलेल्या सोडतीत १९२४ बालकांची निवड करण्यात आली होती. प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ मिळूनही तांत्रिक अडचणींमुळे किंवा हवी असलेली शाळा न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील ५३० जागा रिक्त राहिल्या. निवड यादीतील बालकांच्या प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या ५३० जागांसाठी पहिली व दुसरी प्रतिक्षा यादी जाहिर करण्यात येऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतरही अनेक जागा रिक्त राहिल्याने प्राथमिक शिक्षण संचालयाकडून १८ जुलै रोजी तिसरी प्रतीक्षा यादी जाहिर करण्यात आली.
प्रवेशासाठी २८ जुलैपर्यंत मुदत
निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंत पहिल्या व दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील बालकांना प्रवेश देण्यात आला. आता तिसऱ्या प्रतीक्षा यादीत ६० बालकांची निवड झाली असून, निवड झालेल्या बालकांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी त्यांच्या पालकांना २८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.