आरटीई : रिक्त जागांसाठी सोडतीची पालकांना प्रतीक्षा
By atul.jaiswal | Published: May 27, 2019 02:31 PM2019-05-27T14:31:33+5:302019-05-27T14:32:10+5:30
या जागा रिक्त जागांसाठी दुसरी सोडत कधी काढण्यात येते याकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागलेले आहे.
अकोला: दुर्बल व वंचित घटकांसाठी राखीव असलेल्या ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांवर पहिल्या सोडतीत निवड झालेल्या १८६५ विद्यार्थ्यांपैकी १३९0 विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या राखीव जागांवर प्रवेश घेतला असून, ५१0 जागा उरल्या आहेत. या जागा रिक्त जागांसाठी दुसरी सोडत कधी काढण्यात येते याकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागलेले आहे.
जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकांसाठी आरटीई नोंदणीकृत २0७ शाळांमध्ये एकूण २३७५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागांसाठी ‘आरटीई’ अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज मागविले होते. पालकांच्या मागणीनुसार अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात दुर्बल व वंचित घटकांतील तब्बल ६ हजार ४१४ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरले होते. पहिल्या फेरीत १८६५ पाल्यांची इंग्रजी व मराठी शाळांमधील राखीव जागांसाठी निवड करण्यात आली. प्रवेशासाठी १० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपली असून, अजुनही ५१0 रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी सोडत कधी काढण्यात येणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. निवड झालेल्या १८६५ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १३९0 विद्यार्थ्यांचे जिल्ह्यातील व शहरातील नामांकित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश झाले आहेत. (प्रतिनिधी)