विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर येणार आरटीई शेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 11:06 AM2021-04-18T11:06:10+5:302021-04-18T11:09:16+5:30
RTE remarks will appear on students' marksheet : पास किंवा नापास असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार वर्गोन्नत असा शेरा दिला जाणार आहे.
अकोला : कोरोनामुळे परीक्षा न घेताच, विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे गुणपत्रिका दिल्या जाणार असून, त्यावर पास किंवा नापास असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार वर्गोन्नत असा शेरा दिला जाणार आहे.
राज्य मंडळाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ एप्रिल रोजी हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ६ एप्रिल रोजी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार यंदा कोरोनाच्या कारणामुळे ज्या विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन करता आले नाही त्यांना आरटीई कायद्याच्या कलम १६ नुसार पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्या प्रगती पुस्तकावर आरटीई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा राहणार आहे. राज्यात पाचवी ते आठवीच्या शाळा १५ दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. तर अनेक ठिकाणी पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. अशा विद्यार्थ्यांचे शाळांकडून संकलित मूल्यमापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनातील संपादणूक लक्षात घेऊन त्याचे रूपांतर १०० गुणांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांची श्रेणी निर्धारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शाळेत विशेष प्रशिक्षणाचे निर्देश
यंदा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता, पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे त्यांचा अभ्यास मागे पडण्याची भीती आहे. त्यामुळे पुढील सत्राच्या सुरुवातीलाच शाळेत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यात विद्यार्थी मित्र या पुस्तिकेचा आधार घेऊन नियमित वर्गाध्यापन करण्याचेही निर्देश आहेत. तसेच यंदाचे नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे.