अकोल्यात भारिप-बमसंमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:15 PM2018-05-10T14:15:51+5:302018-05-10T14:15:51+5:30
अकोला : भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून पक्षाच्या जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारणाऱ्या काही अतिउत्साही नवख्यांसोबत व्याख्यानाच्या आधी चांगलीच गरमागरमी झाली.
अकोला : भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून पक्षाच्या जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारणाऱ्या काही अतिउत्साही नवख्यांसोबत व्याख्यानाच्या आधी चांगलीच गरमागरमी झाली. अखेर नियोजनात त्यांचा सहभाग घेत वादावर तात्पुरता पडदा पडला.
भारिप-बमसंची कार्यकारिणी बरखास्त झाल्यापासून काही नवे चेहरे चांगलेच चेकाळल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात सुरू झाला. त्यातच पक्षाचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीने जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची घोषणा अद्यापही न केल्याने पक्षातील उत्सुकता शिगेला पोचली आहे. त्यातच काहींनी अकोला जिल्हाध्यक्ष पदासाठी आधीपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काहींनी तर पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्यापूर्वी स्वत:ला त्या पदासाठी घोषित केल्याचेही प्रकार लगतच्या काळात घडले आहेत.
दरम्यान, पक्षाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी नियोजन समिती गठित करण्यात आली. त्यामध्ये सहभागी असलेल्यांनी काही जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांना डावलण्याचे प्रकार सुरू केले. या प्रकाराने संतप्त झालेल्या काहींनी बुधवारी दुपारी यावर काही संबंधितांना जाब विचारला. त्यावेळी वादावर पडदा टाकण्यासाठी व्याख्यानाच्या कार्यक्रमात त्या पदाधिकाºयांना सहभागी करून घेण्यात आले.
- जिल्हाध्यक्ष पदासोबतच जिल्हा परिषदेवर डोळा
ज्या काही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांनी जुन्या-जाणत्यांना टाळून सवतासुभा निर्माण करण्याचा प्रकार सुरू केला, त्यांनी एकाचवेळी दोन साध्यावर नजर ठेवली आहे. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत ज्यांचा अडसर येतो, त्यांना बाजूला सारणे, त्यायोगे जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा कार्यकारिणीत पद मिळवणे, हा एक आणि दुसरे म्हणजे, येत्या काळातील जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट वाटप समितीवर ताबा घेणे, हे दोन उद्देश समोर ठेवून सध्या भारिप-बमसंमध्ये ‘रॅट रेस’ सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दिवसागणिक पक्षाच्या पदाधिकाºयांमध्ये वादाच्या ठिणग्या पडत आहेत.
- महापालिका निवडणुकीतील पानिपतचा विसर
ज्यांनी आता पक्षाची सूत्रे हातात घेण्याची धडपड सुरू केली आहे. त्यापैकी अनेकांनी महापालिका निवडणुकीत पक्षाला पराभवाचे पानिपत पाहण्यास भाग पाडले आहे. त्यातील अनेक प्रकरणांच्या तक्रारीही नेतृत्त्वाकडे झालेल्या आहेत. तरीही जिल्हा कार्यकारिणी किंवा जिल्हा परिषद निवडणुकीची धुरा आपल्याच खांद्यावर येईल, यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवून काम सुरू केले आहे.