शिक्षकाचे मुलासोबत असभ्य वर्तन
By admin | Published: September 28, 2015 02:08 AM2015-09-28T02:08:38+5:302015-09-28T02:08:38+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील घटना; १६ पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार करून मागितले मुलांचे दाखले.
जळगाव जामोद (जि. बुलडाणा): तालुक्यातील जामोद येथील एका खासगी मराठी उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षकाने शाळा परिसरात लहान मुलासोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार काही लोकांनी बघितल्यामुळे समोर आला आहे. प्रकरणी शाळा मुख्याध्यापकांकडे संबंधित शिक्षकाची पालकांनी २६ सप्टेंबरला लेखी तक्रार केली. सोबतच पाल्यांचे दाखलेही परत मागितले. लहान मुलासोबत शिक्षकाने हे असभ्य वर्तन करण्याचा प्रकार २३ सप्टेंबरला रात्री आठ वाजता झाल्याचे पालकांनी पाहिल्याचे बोलल्या जात आहे. त्यासंदर्भात जामोद येथील गजानन आग्रे या पालकासह १६ जणांनी श्री संत जना-मुक्ताई मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी. के. धुळे यांच्याकडे त्यांच्या मुलांचे दाखले परत मागितले आहेत. याबाबतच्या अर्जात त्यांनी नमूद केले आहे की, शाळेत शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचे भवितव्य धोक्यात असून, भविष्यात अशा प्रकारास माझा पाल्य बळी ठरू नये व वाममार्गाला लागू नये म्हणून माझ्या मुलाचा दाखला परत करावा. या प्रकारामुळे तालुक्यातील शैक्षणिक वतरुळामध्ये खळबळ उडाली असून, संबंधित प्रकाराबाबत गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आलेली नाही. दुसरीकडे हा प्रकार शाळेच्या संचालक मंडळातील कथित स्तरावरील वादातून झाला असावा, अशीही चर्चा आहे. १६ पालकांच्या आलेल्या सर्व अर्जाबाबत संस्था सचिवांकडे अहवाल सादर केला आहे. संबंधित शिक्षकाला दोन दिवसात खुलासा करावा, असे पत्र दिले. यापूर्वी शाळेत असा प्रकार कधी घडला नाही आणि संबंधित शिक्षकाविरोधात यापूर्वी कुणाची तक्रारही नसल्याचे स्पष्टीकरण त्या शाळेचे मुख्याधापक बी. के. यांनी दिले.