अकोल्यातील नवोदय विद्यालयात रॅगिंग
By admin | Published: February 28, 2017 01:53 AM2017-02-28T01:53:25+5:302017-02-28T01:53:25+5:30
पोलिसात तक्रार; इमारतीवरून फेकल्याने विद्यार्थ्याचा पाय मोडल्याचा आरोप
अकोला, दि. २७- बाभूळगाव जहाँ. येथील जवाहर नवोदय विद्यालयात बारावीच्या एका विद्यार्थ्याने आठवीच्या विद्यार्थ्याचे सतत एक वर्ष रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रॅगिंग होत असल्याची तक्रार प्राचार्यांंकडे केल्यामुळे, या विद्यार्थ्याला विद्यालयाच्या इमारतीवरून फेकण्यात आले. त्यामुळे त्याच्या पायाचे हाड मोडल्याचा आरोप पालकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
बोरगाव मंजू येथील दिनेश गोपाळराव खंडारे यांचा मुलगा अमन नवोदय विद्यालयात आठवीत शिकतो. त्याला बारावीत शिकणारा अक्षय जाधव वर्षभरापासून त्रास देत आहे. त्याच्याकडून कपडे धुण्यापासून, तर गृहपाठ लिहून घेण्यापर्यंंतची कामे जाधव करून घेत होता. तसेच अमनच्या खोलीमध्ये येऊन काठीने मारहाण करायचा. अमनने याची तक्रार प्राचार्य बैलमारे, विद्यालयातील सर्व वरिष्ठांकडे केली; परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात न आल्याचा आरोप खंडारे यांनी फिर्यादीत केला आहे. प्राचार्यांंकडे तक्रार केल्याने २२ फेब्रुवारीच्या रात्री ८.१५ वाजता शाळेच्या छतावरून अक्षयने अमनला लोटून दिले. शिक्षकांनी त्याला सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायाचे हाड मोडले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असेही खंडारे यांनी म्हटले आहे.
अमन खंडारे हा विद्यालयाच्या बाल्कनीमधून पाय घसरल्याने पडला. त्याने ही बाब चौकशीमध्ये स्वत: सांगितली आहे. तसेच त्याने त्याला होत असलेल्या त्रासाबद्दल कधीही तक्रार दिलेली नाही.
-डी. एस. थूल,
उपप्राचार्य.