महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ सोडत तिकिट विक्रीचे निकष बदलले
By admin | Published: January 2, 2016 08:36 AM2016-01-02T08:36:29+5:302016-01-02T08:36:29+5:30
लोकमत इम्पॅक्ट; तिकिट खरेदीची बंधनं शिथील; शासनाने काढला नव्याने आदेश.
राजेश शेगोकार/बुलडाणा : महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ न्यू ईयर सोडतीची ५ हजार तिकिटे खरेदीचे बंधन राज्य शासनाने टाकल्यामुळे राज्यातील एकाही विक्रेत्याने तिकिटाची उचल केली नव्हती. त्यामुळे ही सोडतच रद्द होण्याचा मार्गावर असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने ३0 डिसेंबर रोजी प्रकाशीत केल्यानंतर शासनाला जाग आली असून, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वित्तविभागाने आदेश काढून तिकिटाच्या खरेदीबाबत २४ नोव्हेंबर रोजी काढलेला अध्यादेश रद्द करून जुनेच धोरण कायम ठेवले आहे. राज्याच्या अल्पबचत संचालनालयाच्या वतिने महाराष्ट्र राज्य लॉटरीची नाताळ न्यू ईयर सोडतीचे दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षीसुद्धा ५ जानेवारीला नाताळ न्यू ईयर सोडत काढली जाणार होती. त्यासाठी राज्य शासनाच्या अल्पबचत संचालनालयाच्या वतिने ४ लाख तिकिटे छापण्यात आली; मात्र या तिकीटाच्या विक्रीबाबत २४ नोव्हेंबर रोजी वित्त विभाग तसेच अल्पबचत लॉटरी संचालनालयाचे कक्षाधिकारी माधव आव्हाड यांच्या सहीने अध्यादेश जारी करण्यात आला. या अध्यादेशामध्ये लॉटरी विक्रेत्यांना किमान ५ हजार तिकिटे खरेदी करण्याचे बंधन टाकण्यात आले. यासोबतच विक्रेत्यांना मिळणार्या कमीशनबाबतही नव्याने नियम घोषीत करण्यात आले. पूर्वी ५00 ते ४९ हजार ९९९ तिकीटांच्या खरेदीवर विक्रेत्यांना २0 टक्के कमीशन दिले जात होते. २४ नोव्हेंबरच्या अध्यादेशानुसार ५ हजार ते १ लाख तिकिटाच्या खरेदीवर २0 टक्के कमीशन ठेवण्यात आले. शंभर रूपये किमतीच्या ५00 तिकिटांची खरेदी करणार्या सामान्य विक्रेत्यालाही किमान ५ हजार तिकिटांची खरेदी करणे बंधनकारक झाल्याने त्यांना आर्थिकदृष्टया ही बाब परवडणारी नसल्याने एकाही विक्रेत्यांने तिकिटांची उचल केली नाही. ही बाब ह्यलोकमतह्ण ने प्रकाशीत करताच वित्तविभागाने तत्काळ दखल घेत १ जानेवारी रोजी सुधारित आदेश काढला आहे. यामध्ये ५00 ते ५0 हजार तिकिट खरेदी करणार्या एजंटांना पूर्ववत २0 टक्के कमीशन कायम ठेवण्यात आले असून, कमीशनचे स्वरूप नियमित सोडतीप्रमाणेच ठेवले आहे.
आता सोडत झाली तरी शासनाला तोटा
वित्त विभाग तसेच अल्पबचत लॉटरी संचालनालयाच्या नियमानुसार प्रत्येक सोडतीनुसार कराचा भरणा शासनाच्या तिजोरीत करावा लागतो. त्यामुळे आता नव्या अध्यादेशनुसार तिकीटे विक्री झाली तरी करापोटी शासनाकडे तब्बल १२ लाख रूपये अल्पबचत संचालनालयाला भरावे लागणारच आहेत. नाताळ न्यू ईयर सोडत ५ जानेवारी रोजी होणार असून तिकीटासंदर्भात नवा आदेश १ जानेवारी दूपारी ३ वाजता काढण्यात आला. त्यामुळे २ जानेवारी व ४ जानेवारी हे दोन दिवस कामकाजाचे असल्याने किती तिकीटांची विक्री होईल, याबाबत संशय कायमच आहे. सण उत्सवाच्या निमित्ताने निघणारी विशेष सोडत मंगळवारी असेल तर त्या दिवशी निघणारी साप्ताहीक सोडत रद्द करण्याचा नियम असल्याने शासनाच्या महसुलाचा दूहेरी तोटा होणारच आहे.