मुलांचे अपहरण करणारी टोळी आली, ही अफवा; अप्पर पोलीस अधीक्षक राऊत यांची माहिती
By नितिन गव्हाळे | Published: September 21, 2022 06:29 PM2022-09-21T18:29:34+5:302022-09-21T18:29:40+5:30
जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरविली जात आहे.
अकोला: सध्या सोशल मीडियावर एक चित्रफितीने चांगलीच व्हायरल झाली असून, त्यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली ही अफवा आहे. जिल्ह्यात कुठे मुलांच्या अपहरणाची घटना घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी बुधवारी दुपारी दिली.
जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरविली जात आहे. पोलिसांनी याचा तपास, चौकशी केली. मात्र, कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नसल्याचे अप्पर पोलिस अधीक्षकांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात एकाही पोलीस ठाण्यामध्ये लहान मुलांचे अपहरण झाल्याची नोंद नसल्याचेही त्यांना स्पष्ट केले आहे.
दुर्गात्सव, दसरा निमित्ताने बंदोबस्त२६ सप्टेंबर रोजी घटनास्थापना, दुर्गाउत्सव, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पृष्ठभूमिवर जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेतली जात असून, पोलिसांची गस्त, नाकाबंदीही वाढविण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालयांना सूचना
शाळा, महाविद्यालय प्रशासनाने सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. काही आक्षेपार्ह आढळून आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, अशी सूचना शाळा-महाविद्यालयांना देण्यात आल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी सांगितले.