कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:37+5:302021-04-30T04:23:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : शासनाकडून १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : शासनाकडून १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी ज्या नागरिकांनी पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतला आहे, त्यांची विहीत मुदत संपत असताना डोस उपलब्ध झाले नसल्यामुळे सगळीकडे बोंबाबोंब सुरू झाली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी लाभार्थींची संख्यावाढ झाल्यामुळे आरोग्य विभागाकडून केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली. अगदी गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू करण्यात आले. ऑनलाईन प्रक्रियेसाठी आवश्यक ती सुविधा देण्यात आली. त्यानंतर चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील कॉमार्बिड रुग्णांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड अशा दोन्ही लसींचे डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. सुरुवातीला कोव्हॅक्सिनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर मात्र कोविशिल्डचेच डोस उपलब्ध करण्यात आल्याने कोव्हॅक्सिनची बहुतांश केंद्रे बंद पडली व या केंद्रांवर कोविशिल्डचे डोस उपलब्ध करण्यात आले. मात्र, ज्या व्यक्तींनी पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतलेला आहे, त्यांना चार ते पाच आठवड्यांत कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेणे आवश्यक असताना, तो उपलब्ध नसल्याने आता ओरड सुरू झाली आहे. आता ३० एप्रिलला काही प्रमाणत ही लस उपलब्ध हाेईल, अशी शक्यता आहे.
कोव्हॅक्सिनचे ३ हजार डोस आवश्यक
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचे डाेस घेणाऱ्या ३ हजार नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या डाेससाठी कोव्हॅक्सिनचे ३ हजार डोस आवश्यक आहेत.