चतारी येथील ग्रामीण रुग्णालय समस्येच्या विळख्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:19 AM2021-04-11T04:19:07+5:302021-04-11T04:19:07+5:30
पातूर : तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालय समस्येच्या विळख्यात सापडले आहे. रुग्णालयाची इमारत धोकादायक झाली असून, रुग्णालयात पिण्याच्या ...
पातूर : तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालय समस्येच्या विळख्यात सापडले आहे. रुग्णालयाची इमारत धोकादायक झाली असून, रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यासाठी शासन सर्वोतोपरी योजना राबवीत आहे; मात्र काही ठिकाणी सुविधा मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रुग्णालयात सुविधांचा अभाव दिसून येत आहे. तालुक्यातील चतारी ग्रामीण रुग्णालयातील कारभार ढेपाळला असून ग्रामीण रुग्णालये समस्येच्या विळख्यात सापडली आहेत. ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून, पडझड सुरू आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात सापडला आहे. इमारतीचा काही भाग रुग्णांच्या अंगावर कोसळल्याचा प्रकारही येथे घडल्याची माहिती आहे. याबाबत वारंवार तक्रारी देऊनही सार्वजनिक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांसह रुग्णांचे हाल होत आहेत. तसेच रुग्णालयातील रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन रुग्णालयातील समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे. (फोटो)
-----------------------------------
रुग्णालयातील अनेक पदे रिक्त
तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी रिक्त झालेल्या क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा भरणा आरोग्य विभागाकडून केला नाही. परिणामी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून, रुग्णांची गैरसोय होत आहे.