ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी विसर्ग!
By admin | Published: May 2, 2017 01:43 AM2017-05-02T01:43:56+5:302017-05-02T01:43:56+5:30
महान- ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
महान : खांबोरा उन्नई बंधाऱ्याची पाणी पातळी खोलवर गेल्याने ६४ खेडी गावांना व मूर्तिजापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, करिता मागणीनुसार दर दहा दिवसांनंतर महान धरणातून सिंचन व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून ३० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता महान धरणाच्या दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून पाणी सोडण्यात आले. पाणी सोडल्यानंतर धरणात २९ टक्के जलसाठा उपलब्ध होता.
महान धरणाचे सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास जवळपास दीड ते दोन दिवस लागते. पाणी पोहोचल्यावर महान धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येणार असल्याचे महान पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. धरणातून सोडलेले पाणी ६४ खेडी व मूर्तिजापूर शहर व गुरे-ढोरांसाठी आहे. याचा उपयोग शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामासाठी घेता येणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. महान धरणातून पाण्याचा विसर्ग ३१ मार्चपासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता; परंतु खांबोरा उन्नई बंधाऱ्यावरून ६४ खेडी गावांसह मूर्तिजापूर शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा असल्याने महान धरणातून सर्वप्रथम १० एप्रिल ,२० एप्रिल व ३० एप्रिल असे एका महिन्यात दर दहा दिवसांनी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. सध्या महान धरणात एकूण २९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे; तसेच अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले असून त्यापैकी दुसरा व्हॉल्व्ह पाण्यावरती उघडा पडला आहे. धरणातील सोडलेले पाणी खांबोरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पोहोचल्यावर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडणे बंद करण्यात येईल. धरणातील जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी बोरगाव मंजुचे नितनवरे, शाखा अभियंता सय्यद, जानोरकर, पिंपळकर, पाठक, शिराळे, हातोलकर, अकबर, शहा, अ. अजीज हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत.