एस. राममूर्ती जिल्हा परिषदेचे नवे ‘सीईओ’
By admin | Published: June 6, 2017 12:50 AM2017-06-06T00:50:37+5:302017-06-06T00:50:37+5:30
बदली रद्द करण्यात माने यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेतील शीर्षस्थ असलेले मुख्य कार्यकारी पदावर आता गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असलेले एस. राममूर्ती यांची बदली झाली आहे. या पदावर गेल्या दोन महिन्यांपूर्वी बदली झालेले पुणे जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष व्ही.व्ही. माने ती रद्द करण्यात यशस्वी झाले आहेत.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांच्या जागेवर माने यांची बदली झाली होती. बदलीच्या दिवशीच विधळे यांनी प्रभार सोडला. तसेच कोणत्याच प्रकरणात पाय गुंतवायचा नव्हता, म्हणून निर्णय न घेतल्याची कबुलीही दिली होती. दरम्यान, विधळे यांनी माने यांना जिल्हा परिषदेतील वस्तुस्थिती कथन केली. त्यावर निर्णय घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे माने यांनी रुजू न होताच बदली आदेश फिरवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार आता माने यांच्याऐवजी शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. २०१३ च्या तुकडीतील आयएएस असलेले एस. राममूर्ती गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेत प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेले एस. राममूर्ती येत्या शुक्रवारी जिल्हा परिषदेत रुजू होणार आहेत. अहेरी येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रभार सोपवल्यानंतर ते अकोल्यात येणार आहेत.