एस. टी. कामगारांचे वेतन देय तारखेला अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:51+5:302021-09-07T04:23:51+5:30
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दीड लाखाच्यावर कर्मचारी आहेत. कोरोना काळातही प्रचंड ...
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दीड लाखाच्यावर कर्मचारी आहेत. कोरोना काळातही प्रचंड हालअपेष्टा सहन करत आपल्या जिवाचीही पर्वा न करता एस. टी. कामगारांनी आपली भूमिका चोख बजावली. या कर्मचाऱ्यांना हक्काच्या मासिक वेतनासाठी संघर्ष करावा लागत असून, अनेक एस. टी. कामगारांनी आपली जीवनयात्रा या वेतनासाठी संपवली आहे. वेतन प्रधान अधिनियम १९३६ च्या तरतुदीनुसार किमान १० तारखेच्या आत वेतन अदा करण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. एसटी कामगारांना देय तारखेला वेतन देण्याची मागणी रा. प. प्रवासी मित्र संघटनेचे अध्यक्ष विनोद गवर यांनी परिवहन मंत्री अनिल परब व एस. टी.चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडे निवेदनातून केली आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेतन वेळेत न दिल्यास सरकार विरुद्ध उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करून, राज्यभर प्रवाशांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.