लंघापूरच्या पुनर्वसनासाठी पुरातनकालीन तलावाचा ‘बळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:03+5:302020-12-30T04:25:03+5:30

मूर्तिजापूर : तालुक्यात तीन बॅरेजची निर्मिती करण्यात येत असली तरी रोहणा बॅरेजचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून, ते अद्यापही ...

'Sacrifice' of ancient lake for rehabilitation of Langhapur | लंघापूरच्या पुनर्वसनासाठी पुरातनकालीन तलावाचा ‘बळी’

लंघापूरच्या पुनर्वसनासाठी पुरातनकालीन तलावाचा ‘बळी’

Next

मूर्तिजापूर : तालुक्यात तीन बॅरेजची निर्मिती करण्यात येत असली तरी रोहणा बॅरेजचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून, ते अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. या बॅरेज निर्मितीमुळे अनेक गावे उजाड होणार आहेत. यातील लंघापूर गावचे सिरसो गायरान परिसरात पुनर्वसन करण्यात येत असल्याने यासाठी किमान तीन एकराचा पुरातन तलाव भुईसपाट करण्यात आल्याने भविष्यात सिरसो येथे पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील सिरसो येथील गायरान परिसरात किमान तीन एकरावर ब्रिटिशकालीन तलाव होते. लंघापूर गावच्या पुनर्वसनासाठी या तलावाचा ‘बळी’ दिल्याने गावकऱ्यात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या उमा नदीवर रोहणा बॅरेजची निर्मिती करण्यात येत आहे. या बॅरेजचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे; परंतु या बॅरेज अंतर्गत येत असलेल्या लंघापूर गावचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या गावच्या पुनर्वसनासाठी सिरसो गायरान परिसरातील ४ (२६ हजार ४८२ चौरस मीटर) एकर ‘ई’ क्लास जमिनीचे प्रावधान करण्यात आले. त्या दृष्टीने ले-आउटदेखील करण्यात आले आहे; परंतु याच परिसरात किमान तीन एकर क्षेत्रावर असलेल्या ब्रिटिशकालीन तलावच्या भिंती पाडून तो जमीनदोस्त करण्यात आला आहे; मात्र या तलावाची सरकार दप्तरी नोंदच नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी वीटभट्टी व्यावसायिकांनी या तलावाच्या गाळासह भिंतीची माती चोरून नेली होती. त्या संदर्भात सिरसो ग्रामपंचायतने २००५ साली उपविभागीय अधिकाऱ्यांना रितसर तक्रार केली होती. त्या पश्चात २०१९ मध्ये तलाव तोडल्या जाऊ नये, अशी विनंतीही ग्रामपंचायतने संबंधित विभागाला केली होती; परंतु तेथे तलाव नसल्याच्या माहितीपासून शासन अनभिज्ञ आहे. एकीकडे शासन जलयुक्त शिवारासाठी भर देत असून, त्यासाठी लाखोंचा खर्च होत असताना स्थानिक प्रशासनाच्या अहवालावरून पुनर्वसन विभागाने अख्खा तलावच गायब केला असल्याने गावकऱ्यात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. लंघापूरच्या पुनर्वसनासाठी शासन स्तरावरून जमीन व घरारांसाठी ५० कोटी १२ लाख ७ हजार ४०४ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील २१ कोटी ६८ लाख १६ हजार एवढे पुनर्वसन अनुदान देणे बाकी आहे; परंतु या आणखी ‘ई’ क्लास जागा शिल्लक असताना पुनर्वसनासाठी पुरातनकालीन तलावाचा नाहक ‘बळी’ दिला असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

----------------------------------------

पुनर्वसनासाठी सिरसो गायरान परिसरात ई-क्लास जागेचे प्रावधान आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे; परंतु या जागेवर पुरातन तलाव असल्याची आपल्याला माहिती नाही, या संदर्भात आपण अधिक चौकशी करून अहवाल सादर करणार आहे.

सदाशिव शेलार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अकोला

Web Title: 'Sacrifice' of ancient lake for rehabilitation of Langhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.