शारीरिक शिक्षण शिक्षकांची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:26 PM2020-01-24T13:26:30+5:302020-01-24T13:27:04+5:30
महाराष्ट्र खेळात अव्वलस्थानी विराजमान झाला; मात्र शालेय शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण शिक्षक स्वत:चे स्थान मात्र कायमचे गमावून बसला.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: एकीकडे मैदानापासून लाखो खेळाडू दूर ढकलले जात असताना, आहे त्या खेळात खेळाडू वर्षानुवर्षे टिकवून ठेवून प्रावीण्य संपादन करण्यासाठी मैदानावरील शारीरिक शिक्षण शिक्षकाला स्वत:ला झोकून देऊन मेहनत करावी लागत होती. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त स्वत:साठी नव्हे, तर खेळाडू व महाराष्ट्राला भारतात नंबर वन बनवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. शारीरिक शिक्षण शिक्षकाने शालेय राष्ट्रीय स्पर्धा, पुणे व गुवाहटी येथील खेलो इंडिया युथ गेमसारख्या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवून देऊन शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या अतिरिक्त कामावर पदकांची मोहर उमटवून सिद्ध केले, महाराष्ट्राला खेळात नंबर वन बनविले. महाराष्ट्र खेळात अव्वलस्थानी विराजमान झाला; मात्र शालेय शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण शिक्षक स्वत:चे स्थान मात्र कायमचे गमावून बसला.
२०१४-१५ पासून संचमान्यतेतून शारीरिक शिक्षण शिक्षकांचा दर्जा काढून घेऊन सर्वसामान्य पदवीधर शिक्षकाच्या पंक्तीत त्यास नेऊन बसविले. माध्यमिक मधून उच्च प्राथमिकला वर्गीकृ त केले. एवढे काही घडले असताना २०१७ साली कुठल्याही अभ्यासगटाची तक्रार अथवा या विषयाच्या तासिका कमी करण्याची शिफारस नसताना कला-क्रीडा विषयाच्या तासिका निम्म्याने कमी करून शारीरिक शिक्षणावरच घात केला. आंदोलने, मोर्चे, लाखोंचा उठाव याची दखल घेत शासनाने तासिका पूर्ववत केल्या. पुढे कला-क्रीडा विषयाला भविष्यात व्यवस्थेतूनच बाद करण्यासाठी सेवा, शर्ती अधिनियम सुधारणेच्या नावाखाली नव्याने शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली. यामध्ये शारीरिक शिक्षण विषयासाठी शैक्षणिक अर्हता निर्धारित करून शिक्षक भरतीसाठी मात्र पूर्ण वेळाची अट घातली गेली. पहिली ते आठवी शारीरिक शिक्षण वाऱ्यावर सोडून विषय शिकविण्यासाठी कुठली शैक्षणिक अर्हता हवी, हे कुठेही उल्लेखित न केल्याने भविष्यात शारीरिक शिक्षण व कला शिक्षण मोडीत निघणार आहे. पूर्वी माध्यमिकसाठी शारीरिक शिक्षण शिक्षक भरती बायफोकल पद्धतीने होत होती. ती थांबवून शारीरिक शिक्षणाच्या पूर्ण कार्यभाराची अट नवीन भरतीसाठी घालण्यात आल्याने शारीरिक शिक्षणाचे कंबरडे या निर्णयामुळे मोडणार आहे.
शारीरिक शिक्षण विषयाला प्रचलित अभ्यासक्रमात आठ टक्के भारांश असताना सेवा-शर्ती नियमातील बदल व पूर्ण कार्यभाराची अट यामुळे महाराष्ट्रात शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या अवघ्या एक टक्का जागाही भरल्या जाणार नाहीत, हे आताच झालेल्या भरतीत दिसून आले.
राजेंद्र कोतकर,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ.